प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपची घोडदौड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पक्षाने तिकीट न दिल्याने बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या दोन अपक्ष उमेदवारांनी स्वबळावरच बाजी मारली आहे. तर समान मते पडल्याने चिठ्ठी काढून भाजपच्या एका उमेदवाराला विजयाची लॉटरी लागली आहे.

जालना : घनसावंगी वगळता जिल्ह्यातील मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने घोडदौड सुरू ठेवली आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तरी भाजप पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यापाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आहेत.

जिल्ह्यात वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई, वाटूर, दाभाडी, तळणी, मौजपुरी, सेवली, जळगाव सपकाळ, रोहिलागड, माहोरा, आष्टी आव्हाना, सोयगावदेवी, हसनाबाद, जामखेड, कुंभारझरी, खोराडसावंगी आदी गटांतून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मंठा तालुक्‍यातील खोराडसावंगी गटात शिवसेनेच्या आशामती चव्हाण व भाजपच्या रेणुका हनवते यांना प्रत्येकी 3878 अशी समान मते पडली. त्यामुळे एका बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढून येथे निकाल लावण्यात आला. त्यात भाजपच्या हनवते यांची चिठ्ठी निघाली.

भाजपने विजयी घोडदौड सुरू ठेवलेली असली, तरी जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे यांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे. खुल्या प्रवर्गासाठी येथील अध्यक्षपद असल्याने दावेदार मानले जाणारे बहुतांश उमेदवार विजयी झाले आहेत. राजूर येथे भाजपच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडला होता, मात्र या राजूर गटात शिवसेनेच्या शोभा पुंगळे यांनी बाजी मारली, हे विशेष. पंचायत समिती निवडणुकीत घनसावंगीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, भोकरदनला भाजपने मुसंडी मारली.

 

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशा पांडे यांचा सोयगावदेवी गटातून विजय.
  • राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर आष्टी गटातून जिंकले.
  • शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार तथा माजी सभापती बप्पासाहेब गोल्डे यांची पारनेर गटात बाजी.
  • खोराडसावंगीला शिवसेनेच्या आशामती चव्हाण व भाजपच्या रेणुका हनवते यांना समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठी काढून हनवते विजयी.
  • मौजपुरी गटात माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या पत्नी पुष्पा चव्हाण यांनी मिळविला विजय.
  • भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे यांचा रेवगाव गटात पराभव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर विजयी.
  • कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे रोहिलागड गटातून पराभूत.
  • जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाजपचे बद्रीनाथ पठाडे यांचा बाजार गेवराई गटात पराभव.
Web Title: bjp speeds up in raosaheb danve's home district