देशमुखांची गढी हादरली, लातूरमध्ये भाजपला बहुमत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

जिल्हा परिषद अध्यक्षांचाही पराभव 

चाकूर तालुक्‍यातील पाचही गटांत भाजपने विजय मिळविला आहे.

लातूर : जिल्हा परिषदेच्या 58 जागांसह दहा पंचायत समित्यांच्या 116 जागांच्या गुरुवारच्या (ता. 23) मतमोजणीत सत्ताधारी कॉंग्रेसला धक्का बसला. कधीकाळी जिल्ह्यावर हुकूमत असलेल्या बाभळगावच्या देशमुखांची गढी हादरली. यातून जिल्हा परिषद अध्यक्षांनाही स्वतःची जागा राखता आली नाही. सर्वच तालुक्‍यांत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला असून, मतदारांनी भाजपला बहुमत दिले आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या गुरुवारी झालेल्या मतमोजणीत दुपारी दोनपर्यंत जिल्हा परिषदेच्या 58 पैकी 30 जागांवर भाजप, 14 जागांवर कॉंग्रेस, तर राष्ट्रवादीला तीन जागांवर आघाडी होती. घोषित निकालापैकी भाजपला चार, कॉंग्रेसला एक जागा मिळाली. शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात येरोळ गटात भाजपचा उमेदवार विजयी झाला.

रेणापूर तालुक्‍यात कामखेडा, खरोळा व पानगाव गटात भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर पोहरेगाव गटात कॉंग्रेसचा उमेदवार विजयी घोषित झाला. तेथे फेरमतमोजणी करण्यात आली होती. देवणीचे तीन गट व सहा गणांत भाजपचे उमेदवार विजयी झाले. शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील दोन गटांत भाजपला संधी मिळाली आहे. चाकूर तालुक्‍यातील पाचही गटांत भाजपने विजय मिळविला आहे. निलंगा तालुक्‍यात फक्त भाजपला, औसा तालुक्‍यात कॉंग्रेस व भाजपला संमिश्र संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

लातूर तालुक्‍यातील निवळी गटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर 2600 पेक्षा अधिक मतांच्या फरकाने मागे राहिल्याने त्यांचा पराभव निश्‍चित आहे. (कै.) विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख एकुर्गा गटात विजयी होत आहेत. 
कॉंग्रेसला जिल्ह्यात हादरा बसला असून, विशेषतः लातूर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गट व गणांत कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. त्यापैकी काही पंचायत समित्यांत कॉंग्रेसला खातेही उघडता आलेले नाही, हे विशेष आहे. त्यामुळे समाजमाध्यमांतून भाजपच्या विजयापेक्षा कॉंग्रेस नेत्यांवर टीकेची झोड उठली आहे. 
 

Web Title: bjp surges in latur