लातुरात भाजप 'झीरो' टू 'हिरो'; महापालिकेत एेतिहासिक विजय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

2012 चे पक्षीय बलाबल

  • काँग्रेस : 49 
  • राष्ट्रवादी : 13
  • शिवसेना : 06
  • रिपाइं : 02

लातूर : महानगरपालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने 'झीरो'मधून 'हिरो' होत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सर्वाधिक 41 जागा मिळवल्या आहेत. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता घेतली असून सत्तेतील काँग्रेसला 28 तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना व रिपब्लिकन पक्षाला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी बुधवारी (ता. 19) शहरातील 371 केंद्रांवर मतदान झाले. निवडणूक रिंगणात 401 उमेदवार होते. सुरवातीपासूनच काँग्रेस व भाजपच्या उमेदवारामध्ये सरळ सरळ लढत झाली. काही प्रभागात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनी रंगत आणली होती. शुक्रवारी (ता. 21) शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या सभागृहात सकाळी दहापासून मतमोजणी सुरू झाली.

सुरवातीला आघाडीवर असलेली काँग्रेस काही वेळातच पिछाडीवर गेली. शेवटच्या टप्प्यात तर भाजपने निर्णायक आघाडी घेतली. मागील निवडणुकीत एकही जागा न मिळवलेल्या भाजपने 41 जागा पटकावत महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवली होती. यात शेवटी निलंगेकरांची सरशी झाली असून लातूरकरांनी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला विजयाचा कौल दिला आहे. 

निवडणुकीत काँग्रेसचे विद्ममान महापौर ऍड. दीपक सूळ, स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, गटनेते रविशंकर जाधव, पप्पू देशमुख, अशोक गोविंदपूरकर हे विजयी झाले असून माजी महापौर प्रा. स्मिता खानापुरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांचा पराभव झाला आहे. भाजपमधून माजी उपमहापौर सुरेश पवार व काँग्रसचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे सुपूत्र अजितसिंह पाटील कव्हेकर हे भाजपमधून मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्ममान नगरसेवक राजा मणियार हे एकमेव विजयी ठरले विद्ममान नगरसेवक मकरंद सावे व राजेंद्र इंद्राळे यांना पराभवाचा झटका बसला आहे. शिवसेनेतून भाजपात गेलेले रवी सुडे यांचीही निवडणूकीत पराभव झाला आहे.

    Web Title: BJP wins big in Latur Municipal Corporation election