लातूर : अभिमन्यू पवारांना भाजपमधूनच विरोध; निलंगेकर समर्थकांनी महामार्ग रोखला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणून तेथे कामे केली आहेत. त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क झाला आहे. परिणामी, निलंगेकर आणि पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. 

लातूर : भाजप-शिवसेनेत झालेल्या जागा वाटपांमुळे ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही बंडखोरांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना औसा येथून विधानसभेचे तिकीट मिळाल्याने भाजपमधील नाराज कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील इच्छुक उमेदवार किरण उटगे, बजरंग जाधव, अरविंद निलंगेकर, सेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी रस्त्यावर उतरलेल्या नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यामध्ये अभिमन्यू पवार यांना सर्वांनी विरोध दर्शविला. त्यानंतर काही स्थानिक नेत्यांनी राष्ट्रीय महामार्गावर निदर्शनास सुरवात केली. तीन तासांपेक्षा जास्त वेळ महामार्ग अडविल्याने तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.

महत्त्वाची गोष्ट ही की, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे स्वत: या नाराज कार्यकर्त्यांमध्ये बसलेले पाहायला मिळाले. कारण त्यांनी निलंगा मतदार संघापेक्षा औसा मतदारसंघात जास्त लक्ष घातलं असून त्यांचे बंधू अरविंद निलंगेकर यांच्यासाठी औसा येथून उमेदवारी मागितली आहे. 

काँग्रेसचा बालेकिल्ला आहे औसा

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बसवराज पाटील यांनी शिवसेनेच्या दिनकर मानेंवर जवळपास नऊ हजार मतांनी विजय मिळविला होता. भाजपचे उमेदवार पाशा पटेल यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. परंतु यावेळेस भाजप-सेना युती असल्याने त्याचा फायदा भाजपला होणार की काँग्रेसच यंदा गुलाल उधळणार याकडेच सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. 

अभिमन्यू पवार यांच्याविषयी...

अभिमन्यू पवार यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील उंबडग्यात (ता.औसा) झाला. वडील प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी आहे. प्राथमिक शिक्षण लातूरच्या केशवराज विद्यालयातून पूर्ण केल्यानंतर पवार यांनी दयानंद कॉलेजमधून वाणिज्य पदवीचे शिक्षण घेतलं. त्यानंतर पुणे विद्यापीठात लेबर लॉमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. 

पवार हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते. तसेच महाविद्यालयीन काळात त्यांनी अभाविपमध्येही काम केले होते. लातूर जिल्हा भाजपचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. तसेच 2014 मध्ये ओम माथूर यांचे स्वीय सचिव झाल्यानंतर त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.

तसेच अभिमन्यू पवार यांनी गेल्या काही वर्षांपासून औसा मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला होता. मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणून तेथे कामे केली आहेत. त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क झाला आहे. परिणामी, निलंगेकर आणि पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. 

2014 च्या आकडेवारीनुसार औसा मतदारसंघात 2 लाख 58 हजार 311 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 38 हजार 497 पुरुष आहेत, तर 1 लाख 19 हजार 814 महिला मतदार आहेत. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- कपिलदेव यांचा दोन्ही पदांचा राजिनामा 

- दिवाळी जवळ येतेय...पैशांची गरज आहे? मग...

- RSS महात्मा गांधींना बाजूला करण्याचा प्रयत्न करतंय : सोनिया गांधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP workers blocked highway and protest against Abhimanyu Pawar in Latur