शेतकरी, महिलांच्या प्रश्नांवर भाजपचे धरणे आंदोलन

bjp
bjp

हिंगोली ः शेतकऱ्याची फसवणूक व महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपतर्फे मंगळवारी (ता. २५) जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येंने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव, आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शहराध्यक्ष प्रंशात सोनी, संतोष टेकाळे, हमीद प्यारेवाले, सुनील जामकर, उत्तमराव जगताप, गुड्डू देवकते, अशिष वाजपेयी, कैलास काबरा, श्याम खंडेलवाल, संजय ढोके, पिंटू जाधव, माणिक लोडे, राजेश अग्रवाल, मनोज शर्मा, संदीप वाकडे आदींनी सहभाग नोंदविला.

शेतकऱ्यांचा विश्वासघात केला

या वेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. भाजपचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्‍ट्रवादी बरोबर सत्ता स्‍थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सत्ता स्थापन करण्यापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख व काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकऱ्यांना हेक्‍टरी २५ हजार रुपये, फळबागेसाठी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्‍वाखालील काळजीवाहू सरकारने शेतकऱ्यांना हेक्‍टरी आठ हजार रुपये मदत जाहीर केली होती.

दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश नाही

महाविकास आघाडी सरकारने अवकाळीग्रस्‍त शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी आठ हजार रुपयांपेक्षा एक रुपयाचीही अधिक मदत दिलेली नाही. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू आशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याची फक्‍त अल्‍प मुदतीची पीककर्जमाफी केली. केवळ पीककर्जाचा या कर्जमाफीत समावेश केल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्‍लेख नाही, असा आरोप या वेळी करण्यात आला.

तूर खरेदीचे निकष जाणीवपूर्वक बदलले

तसेच भाजप सरकारच्या कर्जमाफीत पीककर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलीहाऊस, शेडनेट, शेती उपकरणे, पशुपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे ४३ लाख खातेधारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीचे निकष जाणीवपूर्वक बदलण्यात आल्यामुळे २०१७-१८ मध्ये प्रती हेक्‍टरी १४.५ क्‍विंटल खरेदी होत होती. तेथे आता २०१९-२० मध्ये केवळ ८.४६ क्‍विंटल प्रतिहेक्‍टरी इतकीच खरेदी होत आहे. काही जिल्‍ह्यात तर हे प्रमाण ३.६ क्‍विंटल इतके कमी करण्यात आले आहे.

महिला अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ

तसेच महिला अत्याचाराच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्‍कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगांराना कायद्याचा धाक उरलेला नाही. 

वसमत, कळमनुरी येथेही आंदोलन

हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. ॲसिड हल्‍ला, अल्‍पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्‍कार, महिलांना जाळून टाकणे, आशा घटना वाढू लागल्यामुळे महिला, तरुणी, मुलींच्या सुरेक्षचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याचा आरोपही या वेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला आहे. धरणे आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी उपजिल्‍हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, वसमत, कळमनुरी येथेही आंदोलन करण्यात आले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com