लातूरच्या महापौरपदी भाजपचे सुरेश पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

भाजपचा एकही नगरसेवक कॉंग्रेसला फोडता आला नाही. नगरसेवकांच्या एकीमुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार सुरेश पवार यांना 36 मते मिळाली. तर उपमहापौर पदाचे उमेदवार देविदास काळे यांना देखील तितकीच मते मिळाली. भाजपच्या विजयानंतर लातूर महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष केला

लातूर : महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सुरेश पवार यांची तर उपमहापौरपदी भाजपच्याच देविदास काळे यांची निवड करण्यात आली. काठावरचे बहुमत असल्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडणार, भाजपचे नगरसेवक कॉंग्रेसच्या गळाला लागणार अशा वावड्या उठवण्यात आल्या होत्या.

प्रत्यक्षात भाजपच्या सर्व 36 नगरसेवकांमधील एकजूट शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे सुरेश पवार व देविदास काळे यांना निवडणुकीत 36 मते पडली. तर कॉंग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाच्या पांठिब्याने 34 मते मिळाली. भाजपच्या सुरेश पवार यांनी त्यांच्या 36 विरुद्ध 34 मतांनी पराभव केला. 

लातूर महापालिकेत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लढलेली भाजप झिरो टू हिरो ठरली होती. 36 जागा जिंकत बहुमत मिळविल्यावरही महापौरपद आपल्याकडे राखण्यात भाजपला यश येते की नाही, कॉंग्रेस फोडाफोडीचे राजकारण करून पुन्हा सत्ता मिळविणार का? याबाबत गेले काही दिवस लातुरात चर्चा रंगल्या होत्या.

पण त्या हवेतील गोळीबारच ठरल्या. भाजपचा एकही नगरसेवक कॉंग्रेसला फोडता आला नाही. नगरसेवकांच्या एकीमुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार सुरेश पवार यांना 36 मते मिळाली. तर उपमहापौर पदाचे उमेदवार देविदास काळे यांना देखील तितकीच मते मिळाली. भाजपच्या विजयानंतर लातूर महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष केला.

राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक राजा मणियार यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार विक्रांत गोजमगुंडे यांना पाठिंबा देत मतदान केले. पण त्यानंतरही कॉंग्रेसचे संख्याबळ 34 एवढेच झाले. त्यामुळे चमत्काराची भाषा करणारी कॉंग्रेस चांगलीच तोंडघशी पडली. 

Web Title: BJP's Suresh Pawar becomes Latur's Mayor