लातुरातलं रक्त संपलं...

सुशांत सांगवे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

शहरातील रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात रक्त देता का रक्त, अशी विचारणा करण्याची वेळ रक्तपेढ्यांवर आणि रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे.

लातूर  : सातत्याने वातावरणात होणारा बदल, संसर्गजन्य आजारात होत असलेली वाढ, डेंगी-मलेरिया अशा आजारांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रमाण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शहरातील रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात रक्त देता का रक्त, अशी विचारणा करण्याची वेळ रक्तपेढ्यांवर आणि रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीला सुरवात झाली आहे. पण दिवसभर कडक उन्हाचा सामना लातूरकरांना करावा लागत आहे. त्याआधी मागील महिन्यात थंडी, उन्ह आणि पाऊस असे तीनही ऋतू एकाच दिवशी पहायला मिळत होते.

हेही वाचा - पेरलं ते उगवेना, उगलं ते टिकेना

या वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. त्यातच डासोत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंगी, मलेरिया, चिकण गुणीया अशा आजारांबरोबरच इतर संसर्गजन्य आजार झालेल्य रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शहरातील जवळजवळ सर्वच रुग्णालये हाऊसफुल असल्याचे दिसून येत आहे.

क्लिक करा - पपईनं बनवलं लखपती

शहरात दोन सरकारी तर चार खासगी रक्तपेढ्या आहेत. जवळजवळ सर्वच रक्तपेढ्यात सध्या रक्ताची कमतरता आहे. काही रक्तपेढ्यांत पुढील दोन-चार दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. यासंदर्भात लातूर ब्लड बँक संचालक सुषेन तिडके म्हणाले, दैनंदिन शस्त्रक्रिया आणि सध्याच्या वातावरण बदलामुळे वाढलेले आजारपण या प्रमुख कारणांमुळे रक्ताची मागणी वाढली आहे.

हा हा हा - शेंड्यानं लांबवल्या प्लेट्स आणि सिलिंडर

सध्या ए-पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची जास्त गरज आहे. याला मागणी जास्त आहे. शिवाय, निगेटिव्ह रक्तगटातील एकही रक्तगटाच्या पिशव्या शिल्लक नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ वाढली आहे. रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे.

या आहेत रक्तपेढ्या

  • शासकीय रूग्णालय
  • मेडिकल कॉलेज
  • भालचंद्र ब्लड बँक
  • लातूर ब्लड बँक
  • अर्पण ब्लड बँक
  • माऊली ब्लड बँक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood Shortage in Latur Blood Banks