लाच घेताना मंडळ अधिकारी अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

औरंगाबाद - फेरफार रजिस्टरला नोंद करण्याच्या बदल्यात 10 हजारांची लाच घेताना अंबड येथील मंडळ अधिकारी सुधाकर श्‍यामराव बोटुळे याला अटक झाली. ही कारवाई मंगळवारी (ता. 25) "लाच लुचपत'च्या पथकाने सिडको बसस्थानकालगत रिक्षात केली. 

औरंगाबाद - फेरफार रजिस्टरला नोंद करण्याच्या बदल्यात 10 हजारांची लाच घेताना अंबड येथील मंडळ अधिकारी सुधाकर श्‍यामराव बोटुळे याला अटक झाली. ही कारवाई मंगळवारी (ता. 25) "लाच लुचपत'च्या पथकाने सिडको बसस्थानकालगत रिक्षात केली. 

तक्रारदाराची जालुरा (ता. अंबड) येथे गट क्रमांक 32 मध्ये शेतजमीन आहे. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर व उच्च न्यायालय खंडपीठ यांनी आदेशित केल्याप्रमाणे मालकी हक्काच्या रकान्यात अंमल घेऊन सात-बारावर नोंद घेण्यासाठी वडिकाळ्या सज्जाच्या तलाठ्याकडे अर्ज दिला होता. या अर्जाला अनुसरून तलाठ्यांनी पुढील आदेशासाठी अंबड तहसीलदारांकडे अहवाल सादर केला होता. संबंधित अहवालावर नऊ जानेवारीला तहसीलदारांनी मंडळ अधिकारी सुखापुरी व वडिकाळ्या सज्जाच्या तलाठ्याला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तक्रारदाराने मंडळ अधिकारी सुधाकर बोटुळे याची भेट घेतली व फेरफार रजिस्टरला नोंद घेण्याची विनंती केली होती; परंतु बोटुळेने नोंद घेण्याच्या बदल्यात पंचवीस हजारांची लाच तक्रारदाराला मागितली. याविरोधात तक्रारदाराने "लाच लुचपत' विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार, "लाच लुचपत'च्या पथकाने मंगळवारी लाचेची पडताळणी केली. त्या वेळी तडजोडीपोटी बोटुळेने दहा हजारांची मागणी केली व ही रक्कम सिडको बसस्थानकाजवळ आणून देण्याचे सांगितले. त्यानुसार, तक्रारदार सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सिडको बसस्थानकाजवळ आले. रिक्षात बसलेल्या बोटुळेने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताच "लाच लुचपत'च्या पथकाने बोटुळेला पकडले. त्याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून, अटक करण्यात आली. ही कारवाई "लाच लुचपत'चे पोलिस उपअधीक्षक विवेक सराफ, निरीक्षक सचिन गवळी, प्रमोद पाटील, हरिभाऊ कुऱ्हे, दिगांबर पाठक, अरुण उगले, संतोष जोशी, विजय बामंदे, अश्‍वलिंग होनराव, दिलीपसिंग राजपूत यांनी केली. 

तू पाच एकरचा मालक होणार! 
पैशांसाठी हपापलेल्या बोटुळेने तक्रारदाराला "पाच एकरचा मालक होणार आहेस, तुला काही खर्च करावा लागेल,' असे म्हणून पंचवीस हजारांची मागणी केली होती. 

Web Title: Board officer arrested