महापालिकेत बोगस बिलांचे रॅकेट!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

औरंगाबाद - कारकुनापासून ते थेट महापालिका आयुक्‍तांची बोगस सही ठोकून 9 लाख 97 हजारांचे बिल सादर केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या घटनेने महापालिकेत खळबळ उडाली असताना याच कंत्राटदाराने 8 लाख 61 हजार रुपयांचे दुसरे बिल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे सोमवारी (ता. 16) उघडकीस आले. बोगस बिलाच्या एकापाठोपाठ दोन घटना उघडकीस आल्याने महापालिकेत बोगस बिलांचे रॅकेटच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी शोध समिती स्थापन केली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे बोगस सह्या करून किती बिले उचलली? याचा शोध समिती घेणार आहे.

कीटकनाशक फवारणीचे काम करणाऱ्या अजंठा पेस्ट कंट्रोल या कंपनीने कारकुनापासून ते महापालिका आयुक्‍तांपर्यंत सर्वांच्या बोगस सह्या करून व शेरे मारून 9 लाख 97 हजार रुपयांचे बिल मंजूर करून घेण्यासाठी लेखा विभागात दाखल केल्याचे प्रकरण दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आले. यानंतर आयुक्तांच्या आदेशाने आरोग्य विभागाने सिटी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कंत्राटदार ठोंबरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होतो न्‌ होतो तोच याच कंत्राटदाराने लेखा विभागात 8 लाख 61 हजार रुपयांचे बनावट बिल मिळविण्यासाठी दुसरी फाईल सादर केल्याचे उघडकीस आले. या बिलाची मोड्‌स ऑपरेंडी देखील पूर्वीच्याच फायलीसारखी असल्याचे समोर आले आहे. लागोपाठ दोन बोगस फायली आढळून आल्यामुळे असे रॅकेटच असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. सोमवारी (ता. 16) पुन्हा आयुक्तांनी लेखा विभाग आणि आरोग्य विभागातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली.

एकापाठोपाठ दोन प्रकरणांत बनावट बिले उचलण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्त श्री. बकोरिया यांनी असे घोटाळे करणाऱ्यांमध्ये प्रशासनातील नेमके कोण सहभागी आहे, याचा शोध घेण्यासाठी एक शोध समिती स्थापन केली आहे. फाईल दाखल होते; मात्र ती बाहेर न जाता संबंधित कंत्राटदार नेमकी फाईल कसा काढून नेतो, एका विभागात फाईल दाखल झाल्यानंतर तीच फाईल आउटवर्ड न होता तब्बल पंधरा-वीस दिवसांनंतर दुसऱ्या विभागात पुन्हा आवकसाठीच जाते कशी? दरम्यानच्या काळात ही फाईल कुठे असते? अशा अनेक प्रश्‍नांचा शोध आयुक्तांनी नेमलेली समिती घेणार आहे. घनकचरा व्यवस्थापनातील कामे आणि आरोग्य विभागातील कंत्राटदारांनी केलेली विविध कामे तपासून अशी बोगस बिले उचलण्यात आलेली आहेत का? याचा आयुक्‍त आपल्या स्तरावर शोध घेणार आहेत.

सही बोगस, शिक्‍का मात्र खरा
लेखा विभागात दाखल झालेल्या दोन्ही फाईलींचे आवक क्रमांक 4077 व 4078 असे सलग आहेत. या फाईलींमध्ये आरोग्य विभागाचे कल्याण मोरे, अवचित मोरे, डॉ. अर्चना राणे आणि डॉ. सुहास जगताप यांच्या सह्या बोगस आहेत; परंतु लेखा विभागातील मुख्य लेखाधिकारी संजय पवार, युसूफ अली, सईद, दुर्राणी यांच्या सह्या आणि शेरे मात्र बनावट नाहीत. सह्या आणि शेरेही त्यांचेच आहेत. स्वतः आयुक्तांची सही बनावट आहे; मात्र आयुक्तांच्या नावाचा शिक्का मात्र खरा आहे. याचा अर्थ बनावट बिले उचलणाऱ्याने अगदी आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत आपले जाळे पसरलेले आढळते.

कंत्राटदारांनी कामे न करताच बिले उचलली आहेत की एकाच कामाची अनेकदा बिले उचलली आहेत, याचा शोध घ्यायचा असून, संशयास्पद परिस्थिती आढळल्यास गेल्या चार- पाच वर्षांत वाटप झालेल्या बिलांची तपासणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

Web Title: bogus bill racket in municipal