बनावट नोटांचा मराठवाड्यात ‘उद्योग’

औरंगाबाद - बनावट नोटा प्रकरणात उस्मानपूरा पोलिसांनी पकडलेले दोन संशयित.
औरंगाबाद - बनावट नोटा प्रकरणात उस्मानपूरा पोलिसांनी पकडलेले दोन संशयित.

औरंगाबाद - बनावट नोटा बाजारात खपविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश उस्मानपुरा पोलिसांनी केला. यात नांदेड व औरंगाबादचे कनेक्‍शन समोर आले. यातील दोघांना पोलिसांनी पकडले असून मराठवाडाभर याचे जाळे पसरले आहे. संशयितांकडून सात लाख सोळा हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी माहिती दिली, की दिशांत राजा साळवे (वय २४, रा. प्रगती कॉलनी, औरंगाबाद) याने गुंतवणुकीत तिप्पट रकमेचे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांकडून आलेल्या खऱ्या नोटा तो स्वत:कडे ठेवत होता. त्यानंतर बनावट नोटा असलेली तिप्पट रक्कम गुंतवणूकदारांना देत होता. ही बाब उस्मानपुरा पोलिसांना समजल्यानंतर दिशांतची माहिती त्यांनी मिळविली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. दिशांतला नांदेड येथील सय्यद मुसकद्दीक अली सय्यद सादत अली (वय २८, रा. देगलूरनाका) हा बनावट नोटा पुरवित होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली. 

दोघांकडे एकूण सात लाख सोळा हजार पाचशे रुपये सापडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रल्हाद घोडके, कल्याण शेळके, प्रल्हाद ठोंबरे, मनोज बनसोडे, संतोष शिरसाठ, संजयसिंग ढोबाळ यांनी केली.

असा झाला उलगडा
शंभर रुपयांच्या नोटेवर दोन ठिकाणी क्रमांक छापलेले असतात; परंतु बनावट नोटांवर एकाच ठिकाणी क्रमांक होता. त्यामुळे पोलिसांनी खात्री केली, त्यावेळी सर्व नोटा बनावट असल्याचे उघड झाले. यात पाचशेचे अकरा बंडल, दोनशे व शंभर रुपयांचे प्रत्येकी सात बंडल संशयितांकडे आढळले.

मराठवाड्यात जाळे
बनावट नोटांची पेरणी जालना, औरंगाबाद, नांदेडसह पूर्ण मराठवाड्यात होत आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात अवाच्या सव्वा परतावा देण्याचे आमिषही दाखवले जात आहे. यात बनावट नोटा वापरल्या जात असून अंबड व औरंगाबादेतील मुकुंदवाडीत या नोटांच्या निर्मितीसाठी प्रिंटरही असल्याचे यापूर्वी उघड झाले होते.

संशयित उच्चशिक्षित
उच्चशिक्षित असलेला संशयित दिशांत एमएसडब्ल्यूचा विद्यार्थी असून त्याचे वडील प्राध्यापक आहेत. पैसा कमावण्यासाठी त्याने हा शॉर्टकट वापरला. नोटांची छपाई कोठे व कोण करीत होते, संशयितांनी आतापर्यंत किती नोटा खपविल्या याची उकल झाली नाही. पोलिस कसून तपासणी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com