विद्यार्थ्यांना वाटल्या बोगस पदव्या, शैक्षणिक संस्थांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पदव्यांचा बाजार 
संस्थेने शासनाची मान्यता नसतानाही खोटा व बनावट बोर्ड स्थापन केला. अनेक संस्थांना संलग्नता देऊन त्यांची माहिती पत्रके तयार केली. परीक्षा घेऊन अनेकांना अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक पदव्या दिल्याची बाब समोर आली. 

औरंगाबाद - शासनमान्य नसलेल्या शैक्षणिक संस्थांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश दिले. विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आणि पदव्याही दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. विशेषत: इतर काही संस्थांशी संलग्न असल्याचे भासविण्यात आले. यात शैक्षणिक संस्थेचे संचालक, अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. नऊ) फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मराठवाडा बोर्ड ऑफ टेक्‍निकल एज्युकेशन एक्‍झामिनेशन व मॉडर्न टेक्‍निकल इन्स्टिट्यूट अशी संस्थांची नावे आहेत. 
याप्रकरणी डॉ. अभिषेक सुभाष हरिदास (वय 36, रा. कोथरूड) यांनी तक्रार दिली. ते मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. इंटरनेटवर सर्फिंग करताना त्यांना मराठवाडा बोर्ड ऑफ टेक्‍निकल एज्युकेशन एक्‍झामिनेशन संस्थेची वेबसाइट दिसली. या संस्थेकडून अभियांत्रिकी, पॅरामेडिकल, ऍग्रीकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट, हेल्थ आदी अभ्यासक्रम चालविले जात असल्याचे वेबसाइटवरून समजले. त्यांनी या संस्थेचे नाव शासनमान्य यादीत पडताळल्यानंतर ती संस्थाच यादीत नसल्याचे समोर आले. संशयित संस्थेने अनेक शिक्षण संस्थांना स्वत:ची संलग्नता प्रदान केली. विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन पदविकाही दिल्या, ही बाब त्यांना वेबसाइटवरून लक्षात आली. संस्थेची शंका आल्याने त्यांनी याबाबत तक्रार दिली. तंत्रशिक्षण विभागाच्या गठित समितीच्या निष्कर्षानंतर या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
संशयाची केली खात्री 
डॉ. हरिदास यांनी संबंधित संस्थेच्या वेबसाइटवर संपर्क साधला. त्यावेळी प्रवेशप्रक्रियेबाबत त्यांना माहिती दिली गेली. अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल प्रवेशाचे शुल्क भरण्यासाठी बॅंक खाते क्रमांक, ई-मेल आयडीही दिला गेला. त्यानुसार त्यांनी 29 जुलैला न्यू मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या बॅंक खात्यात पाचशे रुपये भरले. तत्पूर्वी 27 जुलैला त्यांना ई-मेलवरून शैक्षणिक कागदपत्रांचीही मागणी झाली होती. 
  

अशी होते शैक्षणिक शुल्क 

  • मेकॅनिक इंजिनिअरिंगसाठी 40 हजार 350 रुपये. 
  • कॉम्प्युटर सायन्ससाठी 28 हजार 50 रुपये 
  • आयटीसाठी 37 हजार 350 रुपये 
  • बीसीएसाठी 18 हजार 50 रुपये. 

 

संशयित संस्थेने शासनाची अनुमती घेतलेली नाही. तंत्रशिक्षणने समिती गठित केली, त्यात संबंधित शैक्षणिक संस्थेने परवानगी न घेता अभ्यासक्रम चालविल्याचा निष्कर्ष दिला. त्यामुळे याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
- संभाजी पवार, सिटी चौक पोलिस ठाणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bogus degrees given to students