बोगस विमा मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - बनावट अपघात, खोटी एमएलसी, खोटा पंचनामा करून, विमा कंपनीच्या सर्व्हेअरकडून सकारात्मक अहवाल घेऊन, विम्यासाठी न्यायालयात दावा करून लाखो रुपयांच्या रकमा लाटणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. विशेषतः यात महानगरपालिकेशी संबंधित डॉक्‍टर, पोलिस, विमा कंपनीचे इन्शुरन्स वकील, सर्व्हेअरसह एंजटांचा समावेश असून, शुक्रवारी (ता. तीन) पोलिसांनी यांतील एकास बेड्या ठोकल्या, तर दोघांना ताब्यात घेतले.

औरंगाबाद - बनावट अपघात, खोटी एमएलसी, खोटा पंचनामा करून, विमा कंपनीच्या सर्व्हेअरकडून सकारात्मक अहवाल घेऊन, विम्यासाठी न्यायालयात दावा करून लाखो रुपयांच्या रकमा लाटणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. विशेषतः यात महानगरपालिकेशी संबंधित डॉक्‍टर, पोलिस, विमा कंपनीचे इन्शुरन्स वकील, सर्व्हेअरसह एंजटांचा समावेश असून, शुक्रवारी (ता. तीन) पोलिसांनी यांतील एकास बेड्या ठोकल्या, तर दोघांना ताब्यात घेतले.

त्रिमूर्ती चौक येथील डॉ. महेश मोहरीर, खासगी एजंट शेख लतीफ शेख अब्दुल (वय 23, रा. समतानगर) व सिटीचौक ठाण्याचा हवालदार आर. आर. शेख अशी तिघांची नावे समोर आली आहेत. त्यातील डॉ. मोहरीरला अटक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. वर्ष 2015 पासून हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र, गत सहा महिन्यांतील अशा प्रकरणांची पोलिसांनी माहिती घेतली आहे. न्यायालयात दाखल झालेल्या सर्व दाव्यांची माहिती पोलिसांनी घेतली. या प्रकरणात एमएलसी (मेडिको लिगल केस) देणारा डॉ. महेश मोहरीर याची पोलिसांनी चौकशी केली, त्या वेळी डॉ. भगवान राऊत, डॉ. भारत राऊत, डॉ. त्रिभुवन अशी विविध नावे समोर आली. पोलिसांनी या व्यक्ती व त्यांच्या रुग्णालयांची माहिती घेतली असता, असे कोणतेही हॉस्पिटल शहरात नसल्याचे पुढे आले. पण, एमएलसीवर ही विविध नावे असली तरी सही एकाच प्रकारची होती, त्यामुळे पोलिसांनी मोहरीरची दुसऱ्यांदा चौकशी केली तेव्हा आपणच अशा नावाने एमएलसी दिल्याची त्याने कबुली दिली, अशी माहिती आयुक्तांनी दिली. एमएलसीवर शिक्का मारण्यासाठी त्यांनी पैठणगेट येथून बनावट शिक्के तयार केल्याचेही आयुक्तांनी सांगितले. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. त्यांना अटक झाली असून, ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्‍वर थोरात, निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे यांच्या पथकाने केली.

मोहरीर महापालिकेत वैद्यकीय अधिकारी आहे. तो यापूर्वी कारागृहात वैद्यकीय अधिकारी होता, असे सूत्रांनी सांगितले. अधिकारी असतानाही त्याचे गारखेड्यातील त्रिमूर्ती चौकात एका इमारतीत पहिल्या मजल्यावर रुग्णालय आहे. त्रिमूर्ती हॉस्पिटल, मोहरीर जनरल व ऍक्‍सिडेंट हॉस्पिटल अशा विविध पाट्या रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावल्या आहेत. विशेषतः बालरोगतज्ज्ञ असूनही त्यासोबतच ऍक्‍सिडेंट हॉस्पिटलची पाटी लावली आहे. मोहरीर इंडियन मेडिकल असोसिएशनचा सचिव असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले; तर आर. आर. शेख हा 2015 मध्ये मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्या वेळी त्याने तीन बोगस प्रकरणांत पंचनामे केले. सिटीचौक ठाण्यात आल्यानंतर सहा ते नऊ प्रकरणे हाताळली. त्याला आणखी काही पोलिस कर्मचारी मिळाले आहेत, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.

Web Title: bogus insurance racket