बोगस पोलिस भरतीचा हायटेक फंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

औरंगाबाद - पोलिस होण्यासाठी डमी उमेदवारांना मैदानी चाचणी द्यायला लावत, लेखी परीक्षेसाठी अन्य दोघांना परीक्षागृहात बसवले. आयफोनचा वापर करून व्हॉट्‌सऍपद्वारे प्रश्‍नपत्रिका परीक्षागृहाबाहेर पाठवून वनवे मायक्रो मोबाईलवरून उत्तरे ऐकून परीक्षा देत मेरिट मिळवत दोघे पोलिस बनल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. ठाणे येथील पोलिस भरतीदरम्यान झालेला हा घोळ औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी उघड केला. यात गुरुवारी (ता. 18) पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

भारत राजेंद्र रूपेकर (नानेगाव, ता. पैठण) व तेजराव बाजीराव साबळे (रा. कांद्राबाद, ता. औरंगाबाद) अशी गैरमार्गाने निवड झालेल्या दोघांची नावे आहेत. गेल्या एप्रिलमध्ये ठाणे येथे पोलिस भरती प्रक्रिया पार पडली. त्यावेळी साबळे व रूपेकर यांनी पोलिस शिपाई पदासाठी अर्ज सादर केले होते. त्यावेळी त्यांनी गावातीलच मित्र झनक चैनीसिंग चरांडे, वहाब नवाब शेख, राजू भीमराव नागरे (रा. सर्व कांद्राबाद) व दत्ता कडूबा नलावडे (रा. भालगाव, ता. औरंगाबाद) यांच्याशी "अर्थपूर्ण' व्यवहार केला. झनक व वहाब यांनी शारीरिक चाचणी दिली. या बदल्यात दोघांना साबळे व रूपेकर प्रत्येकी दोन लाख रुपये तर लेखी परीक्षा देणाऱ्या राजू व दत्ता यांना प्रत्येकी चार लाख देण्याचे ठरले होते. शिपाई पदासाठी अर्ज केलेल्या दोघांनी मैदानी व लेखी चाचणी दिलीच नाही. त्याऐवजी झनक व वहाब यांनी मैदानी व दत्ता व राजू यांनी लेखी परीक्षा दिली. डमी उमेदवारांच्या जोरावर दोघांना मेरिट मिळाले व त्यांची पोलिस म्हणून दलात वर्णी लागली.

केवळ नियुक्तिपत्र येण्याचेच बाकी होते; परंतु दोघांनी चार डमी उमेदवारांना परीक्षेला बसवून शिपाई पद मिळवल्याची बाब या उमेदवारातीलच एकाने स्थानिक गुन्हे शाखेला सांगितली. त्यानंतर पोलिसांनी काद्राबाद व पैठण येथे जाऊन पाच संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपण तोतयेगिरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून दहा मायक्रो मोबाईल व हेडफोन जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरतीसिंह यांनी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक कांचनकुमार चाटे, सहायक निरीक्षक ब्रह्मा गिरी, उपनिरीक्षक विवेक जाधव, भगतसिंग दुलत, राजेंद्र जोशी, सुनील शिरोळे, धीरज जाधव, विक्रम देशमुख, बाबासाहेब नवले, राहुल पगारे, शेख झिया, तांदळे यांनी केली.

व्हॉट्‌सऍपवरून प्रश्‍नपत्रिका बाहेर!
प्रश्‍नपत्रिका हाती पडताच, ती स्कॅन करून राजू व दत्ता यांनी आयफोनद्वारे एका व्यक्तीच्या व्हॉट्‌सऍपवर पाठवली. प्रश्‍नपत्रिकेतील वैकल्पिक प्रश्‍नांची उत्तरे मिळवून दोघांना वनवे मायक्रो मोबाईलवर संपर्क साधून सांगितली. फोनवरून दोघांनी उत्तरे लिहिली.

काय आहे वनवे मायक्रो मोबाईल
वनवे मायक्रो मोबाईल सामान्य मोबाईलपेक्षा आकाराने अत्यंत छोटा असतो. त्यात केवळ सीमकार्ड बसवण्याचीच सोय असते. एकदा यात सीमकार्ड टाकल्यानंतर केवळ इनकमिंग कॉलच रिसिव्ह करता येतात. समोरच्याचे बोलणे ऐकण्यासाठी अद्ययावत वायरलेस हेडफोन असतात. ते कानात टाकल्यानंतरही दिसत नाहीत. या डिव्हाईसची दहा हजार रुपये किंमत असून तोतयांनी ती दिल्लीहून खरेदी केली होती.

एमपीएससी देणारेच मास्टरमाइंड
दत्ता नलावडे व राजू नागरे एमपीएससीची तयारी करतात. नलावडे एमपीएससीची पूर्वपरीक्षा पास झाला आहे. त्यांनी रूपेकर व साबळे यांना पोलिस दलात भरती होण्यासाठी आमिष दाखवले. लेखी परीक्षेत पास करून देण्याच्या बदल्यात चार लाखांची मागणी केली होती. त्यांनीच शारीरिक चाचणीत प्रवीण असलेल्या वहाब व झनक यांची भेट घालून त्यांचीही दोन लाखांची "डील' करून दिली.

अशी दिली मुन्नाभाईंनी परीक्षा
झनक व वहाब यांनी ठाणे येथील एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेत डमी उमेदवार म्हणून रूपेकर व साबळेच्या जागी परीक्षा दिली. यात दोघांना अनुक्रमे 90 व 91 गुण मिळाले. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी नलावडे व नागरे यांनी चाचणी दिली. दोन्ही परीक्षेत दोनशे पैकी 180 गुण मिळवत मेरिट मिळवले.

मायक्रो मोबाईल-आयफोनचा वापर
चौघांच्या मदतीने दोघे बनले पोलिस
ठाणे येथील पोलिस भरतीत घोळ
नियुक्तिपत्र देण्याआधी प्रकार उघड
पाचजण अटकेत, सहावा पसार
आणखी घोळ उघड होण्याची शक्‍यता

Web Title: bogus police recruitment hitech fanda