परभणीत कॉपीसाठी तोतया पर्यवेक्षक

Crime
Crime

परभणी - दहावी व बारावीच्या परीक्षेत मराठवाड्यात कॉप्यांचा सुळसुळाट काही कमी झालेला नाही. कॉपी करण्याचे नाना प्रकार पुढे येत असताना परभणी जिल्ह्यातील "हायटेक विद्यालया'च्या केंद्राने तर कळसच चढविला. दहावीच्या भूमिती विषयाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना मनसोक्त कॉपी करता यावी, यासाठी केंद्रप्रमुखाने शिक्षक नसलेल्यांची अर्थात तोतया परीक्षकांची नेमणूक केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हेसुद्धा तेथील चित्र पाहून ते अवाक्‌ झाले. केंद्र संचालकांसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.

परभणी जिल्ह्यात सामुदायिक कॉपीचे प्रकार होत असतानाही सुरवातीला केवळ किरकोळ पकडापकडीचे प्रकार वगळता कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. यानंतर पृथ्वीराज यांनी शिक्षण विभागाच्या पथकासह जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी द्यायाला सुरवात केली. त्यांचे पथक आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एरंडेश्वर-झिरो फाटा (ता. पूर्णा) येथील हायटेक विद्यालयाच्या केंद्रावर धडकले.

अनधिकृत व्यक्तींच्या मदतीने तेथे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे आढळले. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय केंद्र संचालकाने दहा तोतयांची परीक्षक म्हणून नेमणूक केल्याचे दिसले. शाळेचा मुख्य दरवाजा कुलूपबंद करून यातील काही जण कॉपी पुरविण्यासाठी व पहारा ठेवण्यासाठी टेरेसवर थांबले होते. या वेळी कॉपी करताना 14 विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. या केंद्रातील हा सारा प्रकार पाहून पृथ्वीराज अवाक्‌ झाले. त्यांनी या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. पूर्णा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालयात सीईओ बी. पी. पृथ्वीराज यांनी पथकासह अचानक भेट दिली. भेटीदरम्यान शाळेत गैरप्रकार होत असल्याचे आढळले. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- मंजूषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com