बाळ-बाळंतीण उन्हात रुग्णवाहिकेतच ताटकळले

Ambulance
Ambulance

सिल्लोड - दारूच्या नशेमध्ये तर्रर्र असलेल्या येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकाने तीन दिवसांपूर्वी प्रसूत झालेल्या मातेसह बाळास भरउन्हात अर्धा तास रस्त्यावरच थांबवून ठेवले. हा प्रकार शनिवारी (ता. ११) केऱ्हाळा ते पळशी रस्त्यावर घडला. मद्यधुंद चालकाच्या या बेजबाबदारपणामुळे अखेर महिलेच्या पतीने रुग्णवाहिका चालवीत पत्नी व बाळास घरी नेऊन सोडले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अंधारी (ता. सिल्लोड) येथील माया सतीश साळवे या महिलेने तीन दिवसांपूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात मुलास जन्म दिला. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने (एमएच- २०, सीटी- ५७२५) प्रसूत महिलेसह बाळ व नातेवाईक यांच्यासह अन्य दोन रुग्णांना गावी सोडण्यासाठी येथील कंत्राटी चालक रामेश्वर सहाने निघाला होता.

त्याने रस्त्यावरील गावातील अन्य दोन रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सोडले. त्यानंतर तीन दिवसांचे बाळ, त्याची माता यांना घेऊन अंधारी गावाकडे निघाला. दरम्यान, त्याने केऱ्हाळा ते पळशी रस्त्यावर उन्हात रुग्णवाहिका उभी करून दिली.

उन्हाच्या तीव्रतेमुळे रुग्णवाहिकेतील बाळ, आई घामाघूम झाले. वारंवार रुग्णवाहिका नेण्याबाबत सांगूनही दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या चालकाने याकडे काणाडोळा केला. परिस्थिती पाहून शेवटी प्रसूत महिलेच्या पतीनेच रुग्णवाहिका स्वतः चालवीत पत्नी व बाळास घरी नेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com