उन्हाच्या झळा वाढल्याने विहिरींनी गाठला तळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

पाडोळी (आ.) - होळीनंतर उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. परिसरातील काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तर काही विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांची पाण्याअभावी गैरसोय होत आहे. येत्या काही दिवसांत जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

सलग चार वर्षांनंतर मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे; मात्र मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पाडोळी (आ.) परिसरातील 60 ते 70 फूट खोल असलेल्या विहिरींचा पाझर पूर्णतः आटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने पशुपालक हताश झाले आहेत. एप्रिल व मे महिन्यांत उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने आगामी दोन महिने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही, तसेच पावसाळ्यापर्यंत शेतातील विहिरींना पाणी राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; पण मार्च महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी चिंतेत आहे. 

पावसामुळे विहिरी तुडुंब भरल्याने सोयाबीन, तूर, हरभरा, करडई व अन्य पिकांचा उतारा चांगला मिळाला. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मिटला असला तरी यावर्षी तुडुंब भरलेल्या विहिरी मात्र उन्हाळा सुरू होताच पूर्णतः आटल्या आहेत. तर काही विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे शिवारातील पाणीप्रश्‍न गंभीर झाला आहे. परिणामी पशुधन असलेल्या शेतकऱ्यांसमोर पाणीप्रश्‍न निर्माण झाला आहे. 

Web Title: Bottom of wells due to heat