खासगी बसच्या धडकेत मुलगा ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

चौघे जखमी, एक गंभीर, सेव्हनहिलजवळ घडला अपघात 

औरंगाबाद - कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव खासगी मिनीबसने पायी जाणाऱ्या पाचजणांना धडक दिली. या गंभीर घटनेत मुलगा ठार झाला. तर इतर चौघे जखमी झाले आहेत. त्यातील एकजण जीवनमरणाच्या दारात आहे. ही घटना सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळील एका बॅंकेजवळ रविवारी (ता. सहा) पहाटे चारच्या सुमारास घडली. ही मुलं कर्णपुरा येथे देवीच्या दर्शनासाठी जात होती. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अनिकेत शिवाजी काळवणे (वय 17, रा. मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. तर व सुदर्शन सोळुंके (वय 17, रा. शिवाजी कॉलनी), आदीत्य सिद्धार्थ गायकवाड (वय 16), शुभम संजय नरवडे (वय 16, दोघे रा. शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी), संदीप श्रावण बनसोडे (वय 15) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. जखमी तीनपैकी दोघांना डॉक्‍टरांनी सुटी दिली असुन दोघांवर उपचार सुरु आहेत.

त्यातील सुदर्शनची प्रकृती अत्यंत नाजुक आहे. हे सर्वजण आणि त्यांचे इतर काही मित्र मुकुंदवाडी येथून कर्णपुरा येथे देवीच्या दर्शनासाठी पायी जात होते. पहाटे चारच्या सुमारास सेव्हनहिलजवळील आयडीबीआय बॅंकेजवळ सिडकोकडून आलेल्या मिनीबसने या मुलांना मागुन धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अनिकेतला पहाटे पाऊने पाचच्या सुमारास मृत घोषित करण्यात आले. सुदर्शन सोळंकेवर शर्थीचे उपचार सुरु आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boy kills in private bus