हिंगोली : जिल्‍हा परिषदेच्‍या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

हिंगोली : जिल्‍हा परिषदेच्‍या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

हिंगोली : येथील जिल्‍हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांच्‍या प्रश्नांवर 'पाहूत', 'मार्गदर्शन मागवू' असे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांच्‍या विरोधात रोष निर्माण होवून अखेर आज सोमवारी (ता. 6 सर्वसाधारण सभेवर पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी बहिष्कार टाकला. 

येथील जिल्‍हा परिषदेत मागील काही दिवसापासून पदाधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे हेतुपुरस्‍सर टाळली जात आहेत. कधी शासनाच्‍या मार्गदर्शन मागवण्याचे कारण पुढे केले जात आहे तर कधी यामध्ये पाहूत असे मोघम आश्वासन देवून पदाधिकारी व सदस्यांच्‍या सूचनांना केराची टोपली दाखवली जात आहे. विशेष म्‍हणजे लोकसभा निवडणुकीचे आचारसंहितेचे कारण पुढे करून आचारसंहिता लागू होण्यापूर्वीपासूनच विकासकामांचा मंजुरीला नकारघंटा वाजवण्यात आली होती. त्‍यामुळे विविध विभागातून कोट्यवधी रुपयांचा निधी परत गेला आहे. यामुळे मागील काही दिवसापासून जिल्‍हा परिषद पदाधिकारी व सदस्यांमधून अधिकाऱ्यांबद्दल रोष निर्माण झाला होता. 

दरम्‍यान, आज दुपारी एक वाजता जिल्‍हा परिषदेचे सभागृहात जिल्‍हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्‍या अध्यक्षतेखाली साधारण सभा आयोजित केली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी तुम्‍मोड, जिल्‍हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्‍ही. बनसोडे, सभापती संजय देशमुख, प्रल्‍हाद राखोंडे, जिल्‍हा परिषद सदस्य अंकूश आहेर, बाळासाहेब मगर, अजित मगर, मनीष आखरे,विठ्ठल चौतमल, डॉ. सतीश पाचपुते, संजय कावरखे,  यांच्‍यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्‍थित होते.यावेळी बैठक सुरु होताच सदस्यांनी विषयांची पाहणी केली. सदस्यांचा एकही विषय मार्गी लागला नसल्‍याने तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात आली. यावेळी जिल्‍हा परिषद अध्यक्षा श्रीमती नरवाडे, उपाध्यक्ष श्री. पतंगे, बाळासाहेब मगर, विठ्ठल चौतमल, अंकूश आहेर यांनी तीव्र शब्‍दात नाराजी व्यक्‍त केली. प्रत्‍येकवेळी अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देवून वेळ मारून नेत असल्‍याने पदाधिकारी संतप्‍त झाले. त्‍यानंतर पदाधिकारी व सदस्यांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकत असल्‍याचे जाहिर करून सभागृहातून काढता पाय घेतला. यामुळे अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

पुढील काळात संघर्ष अटळ - अनिल पतंगे, उपाध्यक्ष जिल्‍हा परिषद
जिल्‍ह्‍यातील विकासकामांबाबत सर्वच विभागाकडून नकारघंटा वाजवली जात आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्‍याचा विकास खुंटला आहे. अधिकाऱ्यांच्‍या या धोरणामुळे आज सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. पुढील काळात अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करावी अन्यथा अधिकारी व पदाधिकाऱ्यांत संघर्ष अटळ आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com