प्रेयसीचा खून करून आत्महत्येचा बनाव

प्रेयसीचा खून करून आत्महत्येचा बनाव

उमापूर - विधवा महिलेसोबत तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण असलेल्या प्रियकराने किरकोळ भांडणातून तिचा गळा दाबून खून केला. या घटनेला आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला चकलांबा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) घडली व रविवारी (ता. १७) उघड झाली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरती तुजारे (वय २५, रा. वरूर, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिला दोन मुली व एक मुलगा आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचे आजारात निधन झाले. तेव्हापासून ती माहेरी उमापूर येथे राहत होती. आरतीचा एक भाऊ कामानिमित्त पुण्यात राहतो. तर आई-वडील व दुसरा भाऊ व भावजय ऊसतोडणीसाठी लातूरला गेलेले आहेत. तीन वर्षांपासून आरतीचे गल्लीतच राहणाऱ्या दत्ता किसन खरात (वय ३३) याच्याशी प्रेमप्रकरण सुरू होते. दत्ता विवाहित आहे. कुटुंबातील सर्वजण कामासाठी बाहेरगावी गेल्याने घरी आरती तीन मुलांसह राहत होती. दत्ताचे आरतीच्या घरी वारंवार येणे-जाणे त्याच्या पत्नीला खटकत असल्याने दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी आरतीची तिन्ही मुले खेळण्यासाठी बाहेर गेली. दत्ता आरतीला भेटण्यासाठी गेला. दोघांमध्ये शाब्दिक वादानंतर दत्ताने तिचा गळा आवळून खून केला.

असा उघड झाला बनाव
आरतीचा खून केल्यानंतर दत्ता खरात याने तिचा मृतदेह फासावर लटकावून आत्महत्येचा बनाव केला; तसेच आरतीने आत्महत्या केल्याचा बोभाटा केल्यानंतर मोठी गर्दी झाली. या वेळी ग्रामस्थांच्या मदतीने त्यानेच मृतदेह खाली उतरविला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालात तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे उघड झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com