लाच मागितल्याप्रकरणी पोलिस शिपायावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

वाळूच्या हप्त्यापोटी तीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यातील शिपायाविरुद्ध सोमवारी (ता. पाच) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार रामदास श्रीहरी राख असे पोलिस शिपायाचे नाव आहे. 

औरंगाबाद - वाळूच्या हप्त्यापोटी तीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यातील शिपायाविरुद्ध सोमवारी (ता. पाच) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार रामदास श्रीहरी राख असे पोलिस शिपायाचे नाव आहे. 

लाचप्रकरणी रूपचंद मधुकर वाघमारे यांनी तक्रार दिली. 24 जूनला चालक वाळू वाहतूक करताना पाचोड ठाणे हद्दीत पोलिसांनी त्यांचा हायवा ट्रक पकडून वाळूचोरीचा गुन्हा नोंद केला. यात ट्रकही जप्त करण्यात आला होता. एक जुलैला न्यायालयाने ट्रक सोडण्याबाबत पाचोड पोलिसांना आदेश दिला. त्यामुळे तक्रारदार ट्रक सोडवून घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी राख यांनी तीस हजार रुपये हप्त्यापोटी मागितले. हप्ता न दिल्यास वाळू वाहतूक करू देणार नसल्याची ताकीदही राख यांनी दिली. याविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. दोन ऑगस्टला लाचेची पडताळणी केली असता राख यांनी तीस हजार रुपये लाचेपाटी मागितल्याचे निष्पन्न झाले. परंतु, ऐनवेळी पथकाने सापळा रचल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे तीस हजारांची लाच त्यांनी घेतली नाही. पैसे मागितल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणात विभागाकडून तक्रार देण्यात आली. त्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी संशयित राख यांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडल्याची माहिती ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्याने दिली. 

हप्तेखोरीचा "उद्योग' तेजीत 
सूत्रांनी सांगितले, की औरंगाबाद-बीड मार्गावर दीडशेच्या आसपास वाहनांद्वारे वाळू वाहतूक केली जाते. यातील बहुतांश वाहतूकदारांकडून एका वाहनामागे तीस हजार रुपये गोळा केले जातात. त्यासाठी काही विशेष कर्मचारी नियुक्त आहेत. हप्ता दिल्यानंतरही मागील आठवड्यात चार वाहतूकदारांवर पोलिसांकडून कारवाई झाल्याने वाहतूकदारांत रोष होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribe case against police