
Bribe News : सरपंच, ग्रामसेवकाला पाच हजारांची लाच घेताना अटक; एसीबीची कारवाई
मुखेडः घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना सलगराच्या (खुर्द) महिला सरपंचासह ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी (ता. १३) अटक केली. सरपंच ज्योती खंडेराव पवार (वय ४०) यांनी लाच घेऊन ग्रामसेवक शांताराम देवीदास गवई (वय ५२) यांच्या सोबत दुचाकीवरून जात असताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
तक्रारदार यांच्या आईच्या नावाने सलगरा (खुर्द) (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे कच्चे घर आहे. रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तक्रारदारांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे अर्ज केला. तक्रारदारांना सरपंच पवार आणि ग्रामसेवक गवई यांनी लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावण्यात आला. तक्रारदार हे ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता तेथे दोन्ही लोकसेवक हजर नव्हते. त्यांनी तक्रारदार यांना गावातील पाइपलाइनचे चालू असणाऱ्या कामावर बोलाविले.
त्या ठिकाणी गेल्यानंतर सरपंच पवार यांनी पंचासमक्ष लाच घेतली. त्यानंतर त्या ग्रामसेवक गवई यांच्या सोबत दुचाकीवर जात असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.