मुलगी गेली सासरी अन् आईचे दागिने गेले चोरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

औरंगाबाद : भरलग्नात हायप्रोफाईल वेशात चोर "अवतरून' पाहुणे, नवरी, वधुपिता, मातेसह विहिणबाईंच्या दागिन्यांवर डल्ला मारत आहेत. गुरू लॉन्स येथे 25 डिसेंबरला रात्री अकराच्या सुमारास एका लग्नाच्या स्वागत समारंभातून वधूच्या आईचे एक-दोन नव्हे, तब्बल 42 तोळे सोन्याचे दागिने व रोख सत्तर हजार चोरांनी लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. 

गजानन मंदिर, सारंग हाऊसिंग सोसायटीत जयंत दत्तात्रय तुपकरी राहतात. ते डॉक्‍टर असून, त्यांची मुलगी कल्याणी हिच्या लग्नानिमित्त स्वागत समारंभ 25 डिसेंबरला गुरू लॉन्स येथे झाला. समारंभात डॉ. जयंत तुपकरी यांच्या पत्नी डॉ. ज्योती या व्यस्त होत्या. त्यांच्या पर्समध्ये सुमारे 13 लाख 46 हजार 698 रुपयांचे दागिने होते. या पर्सवर चोरांचे लक्ष होतेच. त्यांची नजर चुकवून चोरांनी पर्ससह राणीहार, मनीहार, कानातले, दोन मंगळसूत्र, चार लहान व एक मोठी अंगठी, नेकलेस, पेंडलसह मंगळसूत्र, चांदीच्या भेटवस्तूसह 42 तोळे सोन्याचे, चांदीचे दागिने, मोबाईल व 69 हजार रुपये लंपास केले. ही बाब उशिराने लक्षात येताच डॉ. जयंत तुपकरी यांनी मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. 

सीसीटीव्हीची तपासणी 
घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. स्वागत समारंभस्थळाचे फुटेज गोळा करण्यात आले असून सायबर सेल व गुन्हे शाखा पथक तपास करीत आहेत. 

लग्नात जाताय... 
सजगता ठेवा 
- लग्नात जाताना मोजकेच पैसे सोबत न्या 
- महागड्या वस्तू समारंभात नेणे टाळा 
- मोबाईल सुरक्षित ठेवा. तो वारंवार काढू नका 
- पाकीट, किमती वस्तू खिशातून वारंवार काढू नका 
- पर्समध्ये दागिने ठेवणे टाळाच 
- पर्स टेबल, खुर्चीवर तसेच कुठेही ठेवू नका 
- शक्‍यतो स्वत:च पर्स सांभाळा, काम असल्यास जवळच्याकडेच द्या

Web Title: brides mother s jwellery get robbed in marriage function