लातूरच्या युवराजांना जमिनीवर आणा- पालकमंत्री निलंगेकर

संभाजी पाटील निलंगेकर, अमित देशमुख
संभाजी पाटील निलंगेकर, अमित देशमुख

लातूर ः कॉंग्रेसच्या देशातील युवराजाला केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पराभव करून जमिनीवर आणले आहे. आता लातूरच्या युवराजची वेळ आली आहे. आशीर्वाद देण्यासाठी श्रीमती इराणी येथे आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना विजयी करून लातूरच्या कॉंग्रेसच्या युवराजांना जमिनीवर आणा, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे केले. 


लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. 16) येथे केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांची जाहिर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, भगवंत खुब्बा, माजी खासदार गोपाळराव पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती, ऍड. शैलेश गोजमगुंडे आदी उपस्थित होते. 


लातूरचा पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. मांजरा नदीचे पाणी लातूरहून पुढे निलंग्यात येते. आज निलंग्यात पाणी शिल्लक आहे. लातूरचे पाणी कोणी चोरले? तुमच्या हक्काचे ते पाणी होते. लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या कारखान्यांनी हे तुमच्या हक्काचे पाणी चोरले आहे. 


पण लातूरला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मैदानावर झालेल्या जाहिर सभेत लातूरकराना ग्वाही दिली आहे, असे श्री. निलंगेकर म्हणाले. 
कॉंग्रेसच्या आमदारांची पार्श्वभूमी जनतेला माहिती आहे. तुम्ही काय विकास केला हेही जनतेला माहित आहे. तुम्ही स्वतःच्या मालकीचे कारखाने काढले. पण भाजपने मात्र रेल्वे बोगी सारखा जनतेचा कारखाना दिला आहे. या कारखान्यामुळे परिसरातील जनतेच्या लेकरांना नोकऱ्या मिळणार आहेत. लाहोटी कुटुंबियांनी आतापर्यंत लातूरला देण्याचेच काम केले आहे. आता जनता त्यांना मते देणार आहे. लातूरचा आमदार भाजपाच होणार असा विश्वास निलंगेकर यांनी व्यक्त केला. 


लातूरच्या हक्काचे पाणी देशमुखांनी चोरले. लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले. त्यांनी स्वतःचे उद्योग उभे केले. जनतेसाठी एकही उद्योग उभा केला नाही. पण भाजपने रेल्वे बोगी हा जनतेचा कारखाना आणला. लवकरच पाण्याचा कायमस्वरुपीही प्रश्न सुटणार आहे. या निवडणुकीत विकासाला साथ देवून दुष्काळ निर्माण करणाऱ्यांना घरी पाठवा, असे आवाहन लाहोटी यांनी केले. यावेळी खासदार शृंगारे यांचेही भाषण झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com