बीड हादरले : भावानेच मुलांच्या मदतीने केली तीन भावांची हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

शेतजमिनीच्या वादातून हाणामारीनंतर धारदार शस्त्राचे वार करून भावानेच मुलांच्या मदतीने तिघा सख्ख्या भावांची हत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 27) दुपारी बाराच्या सुमारास बीड परिसरातील वासनवाडी शिवारात घडली.

बीड - शेतजमिनीच्या वादातून हाणामारीनंतर धारदार शस्त्राचे वार करून भावानेच मुलांच्या मदतीने तिघा सख्ख्या भावांची हत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 27) दुपारी बाराच्या सुमारास बीड परिसरातील वासनवाडी शिवारात घडली.

यातील दोघे जागीच गतप्राण झाले, तर एकाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण, दिलीप व प्रकाश काशिनाथ पवणे (रा. वासनवाडी) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी भाऊ किसन काशिनाथ पवणे याच्यासह त्याची मुले अॅड.कल्पेश व डॉ. सचिन यांच्यावर खुन्हाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत माहिती अशी : शहरातून जाणाऱ्या पिंपरगव्हाण रस्त्यालगतच वासनवाडी शिवारात पवणे कुटुंबीयांची वडिलोपार्जित जमीन आहे. जमिनीच्या वाटणीवरून या कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद होता. यापूर्वीही हाणामाऱ्या झाल्या होत्या. शनिवारी सकाळी याच शेतात पवणे कुटुंबातील दोन गट समोरासमोर आले. यातून झालेल्या तुंबळ हाणामारीत धारदार शस्त्रांचा वापर केला गेला. यात पोटावर शस्त्राचा गंभीर वार लागल्याने दिलीप पवणे व प्रकाश पवणे या भावांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यालगतच्या शेतात त्यांचे मृतदेह पडले होते. गंभीर जखमी किरण यांचा जिल्हा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, ग्रामीण ठाण्याचे फौजदार प्रदीप डोलारे, अशोक दुबाले, लखन जायभाये आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने घटनास्थळी भेटी
दिल्या. जिल्हा रुग्णालयातही हर्ष पोद्दार यांच्यासह अधिकारी जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून बसून होते.  दरम्यान, पवणे कुटुंबातील एकाने नुकताच बीड शहर पोलिसांना वाद होऊ शकतो, असा अर्ज दिला होता. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट होता का, असाही संशय व्यक्त होत आहे. 
  
भावासह वकील व डॉक्‍टर मुलावर खुनाचा गुन्हा 
किरण, दिलीप, प्रकाश व किसन पवणे या चार सख्ख्या भावांत शेतीचा वाद होता. किरण, दिलीप व प्रकाश हे किसनला शेतीचा हिस्सा मागत होते. हे भांडण न्यायालयातही गेलेले आहे. दरम्यान, शनिवारी किसन व त्याची मुले ऍड. कल्पेश व डॉ. सचिन हे शेतात जेसीबी यंत्र घेऊन आले. त्यावेळी उर्वरित तीन भावांनी विरोध केला असता किसन व मुले अॅड. कल्पेश व डॉ. सचिन पवणे यांनी सोबत आलेल्या काही साथीदारांसह धारदार शस्त्रांनी तिघांवर वार केले. यात तिघांचा मृत्यू झाला, कल्पेश व सचिन पवणे हेही जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. याप्रकरणी किशोर दिलीप पवणे यांच्या फिर्यादीवरून किसनसह मुले ऍड. कल्पेश व डॉ. सचिन यांच्यासह इतरांवर
खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother killed three brothers