बंधू हेच खऱ्या अर्थाने गुरु व मार्गदर्शक, आयुक्त पवार यांचे प्रांजळ मत...

गणेश पांडे 
Saturday, 5 September 2020

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा पाच सप्टेंबर रोजी जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी ‘सकाळ’ शी शिक्षक दिनानिमित्त संवाद साधला.

परभणी ः प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षक, मार्गदर्शक येतातच. माझ्याही आले. शालेय जीवनात अनेक गुरुजींची माझ्यावर प्रभाव राहिला. परंतू, खऱ्या अर्थाने माझे मोठे बंधू कामाजी पवार हेच माझे खरे गुरु आहेत, अशी भावना महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने व्यक्त केली. 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा पाच सप्टेंबर रोजी जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा सर्व शिक्षक, गुरुंचा सन्मान आहे. मी मुळचा निवघा (जि.नांदेड) येथील. परंतू, माझे प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी (मुगट, जि.नांदेड) येथे जिल्हा परिषद शाळेत झाले. 

घरात वडीलांना शिक्षणाची आवड 
शाळेतील शंकर गुरुजी नावाच्या शिक्षकांनी माझा गणिताचा पाया पक्का केला. तीनशेपर्यंतचे पाढे, निमकी, पावकी देखील मुखोद्गत करून घेतली. तेथीलच घाटोळ सर, थोरात सर, पाथरकर सर या विद्यार्थीप्रिय शिक्षकांनी देखील मला मोलाचे मार्गदर्शन केले. तर माध्यमिक शिक्षण नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तेथील मंगनाळे सर विशेष आठवणीत राहिले. माझे वडील त्या काळी चौथी पास होते. तलाठी म्हणून त्यांनी सेवा दिली. त्यामुळे घरात वडीलांना शिक्षणाची आवड होती. 

हेही वाचा - नांदेडकरांनो आता तरी व्हा सावध! 

बंधूचे पाठबळ मिळाले 
माझे मोठे बंधू कामाजी पवार यांची परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी निवड झाले. ते शिक्षणासाठी येथे आले व पाठोपाठ मी देखील आलो. बाल विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी व बारावी केल्यानंतर मी सुध्दा कृषी विद्यापीठात प्रवेश घेऊन पदवी घेतली. या दरम्यान मला खऱ्या अर्थाने बंधूचे पाठबळ व मार्गदर्शन मिळाले. आज जो काही आहे तो, त्यांच्यामुळेच. तेथे माझे खऱ्या अर्थाने गुरु व मार्गदर्शक तेच.  

हेही वाचा - धक्कादायक : महापालिकेत एकाने पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न

भावाच्या मार्गदर्शनाखाली मिळाले यश 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्याची वनविभागात निवड झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी देखील स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. अभ्यासातील सातत्य व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास निश्चितच यश प्राप्त होते. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother, this is the true opinion of Guru and guide, Commissioner Pawar ..., Parbhani News