कारखाली चिरडून चुलत भावंडे ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

अल्पवयीनांच्या हाती वाहन नकोच
अपघातात ठार झालेली दोघे भावंडे अल्पवयीन मुले आहेत. केवळ बारा व पंधरा वर्ष त्यांचे वय आहे. चुकीमुळे अपघात घडल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलांच्या वाहन चालविण्यामुळे अपघाताची शक्‍यता जास्त असून, मुलांच्या हाती वाहन न दिल्यास संभाव्य अपघात टळून जीव वाचेल.

औरंगाबाद - भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी बीड बायपासवरून जाताना दुभाजकाला धडकून विरुद्ध लेनमध्ये पडल्यानंतर भरधाव कारने चिरडले. यात अल्पवयीन दोन चुलतभावांचा मृत्यू झाला. हा गंभीर अपघात बुधवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार - अतुल अरुण हातागळे (वय १२, रा. उस्मानपुरा), आदित्य कैसराम हातागळे (१५, रा. ज्ञानेश्‍वरनगर, सातारा) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही चुलतभाऊ होते. बीड येथून आलेला अतुल व आदित्य या दोघांचा भाऊ खंडू हा निशांत पार्क येथील एका अपार्टमेंटमध्ये सफाईकाम करतो. त्याला जेवणाचा डबा देण्यासाठी दोघे जात होते. आदित्य दुचाकी चालवीत होता, तर मागे अतुल बसला होता. 

दोघे गोदावरी टी-पॉइंटपासून देवळाईकडे जाताना काही अंतरावर मास्टरकुक हॉटेलसमोर त्यांचे नियंत्रण सुटून ते दुभाजकाला धडकले. त्यानंतर दुभाजकावरूनच विरुद्ध लेनमध्ये ते पडले. याचदरम्यान देवळाईकडून गोदावरी टी-पॉइंटकडे जाणाऱ्या भरधाव कारखाली ते चिरडले. यात अतुल जागीच ठार झाला. तर उपचारादरम्यान आदित्यचा रात्री मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. यानंतर पाहणी करून त्यांनी दुचाकी हस्तगत केली. या अपघाताची सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

कारसह चालक पसार
पांढऱ्या रंगाच्या कारखाली दुचाकीवरील दोघे चिरडल्यानंतर चालकाने दयामया दाखविली नाही. त्याने घटनास्थळाहून पळ काढला. त्यामुळे कारचा पूर्ण क्रमांक समजू शकला नाही; परंतु ४२०२ असा क्रमांक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली. पोलिस कारचालकाचा शोध घेत आहेत.

अतुल नुकताच आला होता शहरात
अतुलचे वडील चालक असून, त्याला तीन बहिणी व एक भाऊ आहे. तो बहिणीसोबत बीड येथे ऊसतोडीसाठी गेला होता; परंतु आई आजारी असल्याने तिला भेटण्यासाठी अतुल व बहीण आली होती. त्यानंतर तीन दिवसांनंतरच अपघात घडून त्याचा मृत्यू झाला.

तत्काळ व्हावे भूसंपादन
बळींवर बळी जात असलेल्या बीड बायपास रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले; परंतु भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण झाल्यानंतर लगेचच सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू होईल. पर्यायाने दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना या सर्व्हिस रस्त्यांचा मोठा उपयोग होईल. परिणामी संभाव्य जीवितहानी टळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brothers Death in Accident Crime