
किल्लेधारूर (जि.बीड) तालुक्यातील गोपाळपुर शिवारात अज्ञात प्राण्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यावर बांधलेल्या म्हशीचा फडशा पाडला.
किल्लेधारूर (जि.बीड) : तालुक्यातील गोपाळपुर शिवारात अज्ञात प्राण्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यावर बांधलेल्या म्हशीचा फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी (ता. १८) उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. बीड जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम असतानाच ही घटना घडल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाले आहेत. येथील शेतकरी आवेज हाजी अब्दूल रशीद कुरेशी यांची गोपाळपूर शिवारात शेती आहे.
या शेतावर गायी, म्हशी, बैल असा बैल बारदाना गोठ्यात आहे. गोठ्याच्या परिसरात बांधलेल्या म्हशीला अज्ञात प्राण्याने फस्त केल्याची घटना घडली. याबाबत कुरेशी यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणानंतर पशूवैद्यकीय अधिकाऱ्याकडून घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी जागीर मोहा परिसरात हिंस्त्र प्राण्याने चोवीस शेळ्या फाडल्याची घटना घडली होती.
सध्या जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ असल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. याच काळात सदरील घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण कायम आहे. महिनाभरातील ही तिसरी घटना असल्याचे कुरेशी यांनी म्हटले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
Edited - Ganesh Pitekar