पाच महिलांसह पुरात फसली बैलगाडी

संजय राऊत
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

सावंगी (ता. जाफराबाद) : बैलगाडीचालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण, ग्रामस्थही धावले मदतीला

टेंभुर्णी-  सावंगी (ता. जाफराबाद) येथील शेतीची कामे आटोपून पाच महिला गुरुवारी (ता. 26) सायंकाळी बैलगाडीतून घराकडे परतत होत्या. मात्र, पूर्णा नदीच्या पात्रामध्ये मध्यभागी येताच पाण्याचा प्रवाह अचानक वाढून या महिलांसह बैलगाडी पाण्यात फसली. तेव्हा गाडीचालक लक्ष्मण सांडू सावंत यांनी प्रसंगावधान राखत गाडीचे बैल सोडून काठावर नेत मदतीसाठी हाक दिली. त्यानंतर परिसरातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी धावत येत या महिलांना सुखरूप बाहेर काढले.

याबाबत अधिक माहिती अशी, की सावंगी येथील लक्ष्मण सांडू सावंत हे बैलगाडीमधून रेणुका नीलेश वरगणे, कासाबाई राजाराम वरगणे, शकुंतला अंकुश दळवी, शशिकला बाळू माळी व सरूबाई आबाजी, वरगणे शेतीतले कामे आटोपून पूर्णा नदीच्या पात्रामधून सावंगी गावाकडे येत होते. दरम्यान, नेहमीच्या बैलगाडी रस्त्याने नदीतून वाट काढत असताना पूर्णा नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग अचानक वाढला.

लगाडीला जुंपलेला एक बैल नदीच्या एका बाजूला पूर्णपणे डुबल्याने गाडी फसत असल्याचे चालक लक्ष्मण यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गाडी जागेवरच थांबवून सर्व महिलांना गाडीची खुंटी घट्ट धरून ठेवण्यास सांगितले. प्रवाहातून पोहत जाऊन बैलगाडीचे बैल सोडले. दोन्ही बैलांना पोहत कसेबसे नदीच्या काठावर नेले. आरडाओरडा करीत नदीकाठाच्या शेतकऱ्यांना मदतीसाठी हाक दिली. यावेळी परिसरात असलेले जगन वरगणे, गणेश वरगणे, सुखदेव जाधव, बालाजी वरगणे, सतीश वरगणे, नीलेश्वर वरगणे, योगेश्वर वरगणे, सुखदेव वरगणे, कौतिक वरगणे, नितीन दळवी, कृष्णा दळवी ही मंडळी नदीच्या दुतर्फा जमा झाली. लक्ष्मण याने पोहत जाऊन पुन्हा नदीच्या पात्रात असलेल्या महिलांजवळ त्यांना धीर देण्यासाठी दोरखंड घेऊन गेले. नदीच्या दोन्ही बाजूला आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीने नदीपात्रात दोरखंड टाकून लक्ष्मण यांनी महिलांना सुखरूप बाहेर काढले. लक्ष्मण सावंत यांच्या धाडसाने नदीच्या पाण्यात डुंबणाऱ्या महिलांना वाचविण्यात यश आले. त्यासोबतच दोन बैलही वाचले. दरम्यान, श्री. सावंत यांच्यासह पाचही महिलांवर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bullock cart in flood

टॅग्स