बंटी-बबलीला संतप्त महिलांचा चोप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

वाळूज : रोजगार हमी योजनांचे फॉर्म आणि बसमध्ये प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत मिळवून देतो, अशी बतावणी करून हातात बनावट आधार कार्ड देऊन गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला संतप्त महिलांनी चोप दिला. हा प्रकार सोमवारी (ता. 31) तीसगाव परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. 

सातारा परिसरातील सुमन सुनील भिंगारे आणि सुनील उगले यांनी तीसगाव आणि गोलवाडी येथील महिलांना राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेचा फॉर्म तसेच अर्धे तिकीट काढण्यासाठी लागणारे आधार कार्ड बनवून देतो, अशी थाप मारीत सुमारे दीड हजार महिलांकडून सुरवातीला 300 रुपये, नंतर एक हजार रुपये घेतले. ठरल्याप्रमाणे त्यांनी सोमवारी महिलांना त्यांच्या नावाने आधार कार्ड वाटप केले. शंका आल्याने काही सुजाण महिलांनी या आधार कार्डवरील क्‍यूआरकोड स्कॅन केला असता सर्व आधार कार्डवर शोभना महादू आव्हाड (रा. शिवाजीनगर, नाशिक) असे नाव येत होते. त्यामुळे हे आधार कार्ड बनावट असल्याचे उघडकीस आले. परिणामी, संतप्त झालेल्या महिलांनी रोष व्यक्त करीत भिंगारे आणि उगले यांना बेदम चोप देत पैसे परत देण्याची मागणी केली. 

पोलिसांची घटनास्थळी धाव 
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार आर. डी. वडगावकर, तात्याराव पवार, सोनाजी बुट्टे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा संशयितांना पोलिस व्हॅनमध्ये बसविले; मात्र संतप्त जमावाने पोलिसांचे वाहन अडवून अगोदर आमचे पैसे द्या, मगच या दोघांना घेऊन जा, असा पवित्रा घेतला. दरम्यान, पोलिसांनी जमावाची समजूत काढून तक्रार देण्याचे सांगितले. 

Web Title: bunty and babli beaten by mob