पाठलाग करून पकडला घरफोड्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

जालना - सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी करणाऱ्या एका संशयितास पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 11 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. 

जालना - सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी करणाऱ्या एका संशयितास पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 11 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. 

पोलिस सूत्रांनी सांगितले,,की मोदीखाना भागात राहणारे नीलेश निर्मलचंद कासलीवाल यांच्या घरात ता. सात नोव्हेंबर 2016 रोजी चोरी झाली होती. घरी कुणी नसताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून अकरा लाख 54 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास लागत नसल्याने पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना स्वत: या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक मागील काही महिन्यांपासून या गुन्ह्यातील संशयितांच्या मागावर होते. दरम्यान, बीड येथील अट्टल गुन्हेगार शेख अशफाक शेख आसेफ (वय 35) व शंकर तानाजी जाधव (वय 34, दोघे, रा. बार्शी नाका, बीड) हे जालन्यात आल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. संशयितांच्या मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजी पुतळा परिसरात बुधवारी रात्री सापळा लावला. संशयित चोरटे रिक्षाने बडी सडककडे जात असल्याचे दिसताच पथकातील कर्मचारी हिरामण फलटणकर, सदाशिव राठोड यांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे समजताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करताना कॉंस्टेबल श्री. फलटणकर यांचा पाय नाल्यात गेल्याने फ्रॅक्‍चर झाला. पोलिस पथकाने पाठलाग करून शेख अशफाक शेख आसेफ यास पकडले तर शंकर जाधव हा पळून गेला. चौकशीत अशफाक शेख याने मोदीखान्यात कासलीवाल यांच्याकडे घरफोडी केल्याची कबुली देऊन चोरलेला मुद्देमाल काढून दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, कॉंस्टेबल कमलाकर अंभोरे, सॅम्युअल कांबळे, भालचंद्र गिरी, हिरामण फलटणकर, सदाशिव राठोड, सचिन चौधरी, संदीप मांटे, लखनसिंग पचलोरे, विलास चेके, रामदास जाधव, नामदेव राठोड, सुरेश पाटील यांनी ही कारवाई केली. 

Web Title: Burglar caught by the chase