मूर्ती साकारण्यात कारागीर व्यस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर तुळजापूरला कामाला वेग 

तुळजापूर (उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील तुळजापूर (खुर्द) भागात मूर्ती बनविण्याच्या कामास वेग आला आहे. मूर्ती साकारण्यात कारागीर व्यस्त आहेत.

शहरात नवरात्राच्या निमित्ताने पारंपरिक मूर्ती बनविणारे पिढ्यान्‌ पिढ्याचे व्यावसायिक आहेत. त्यात शहरातील नरसिंग ताठे आणि तुळशीराम ताठे यांचा समावेश आहगे. त्यांचा पारंपरिक मूर्ती बनविण्याचा व्यवसाय आहे. नरसिंग ताठे म्हणाले, की आमची चौथी पिढी मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय करते. दीडशे ग्रॅम ते पाच किलो पर्यंतच्या मूर्ती आम्ही साकारतो. कच्चा माल, भटूर, पितळ, कोळसा, इंद्री पावडर आदी वस्तू लागतात. यंत्राचाही वापर करतो. त्याशिवाय अनेक पारंपरिक बाबींचा वापर हमखास करतो. 
नवरात्रीच्या अनुषंगाने अनेक व्यवसायांना वेग येणार आहे. त्यात मूर्ती घडविण्याचे एक महत्त्वाचे काम आहे. तुळजाभवानी मातेच्या मूर्ती बनवून अनेक व्यावसायिकांना त्या विक्रीसाठी दिल्या जातात. 

भाविकांकडून मोठी मागणी
तुळजाभवानी मातेच्या अष्टभुजा, तसेच सिंहासनाधिष्ठीत मूर्ती कारागीर साकारतात. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांकडून या मूर्तींना मोठी मागणी असते. अनेक जण या मूर्तींची घटस्थापना किंवा दसऱ्याच्या मुहूर्तावर पूजा करतात. तुळजाभवानीमातेच्या मूर्तीशिवाय खंडोबा, गणपती यासह विविध मूर्ती शहरातील कारागीर साकारतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Busy craftsmen