सरत्या वर्षाला बाय बाय, नववर्षाला 'वेलकम'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

औरंगाबाद : सरत्या वर्षाला रामराम ठोकून नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. मित्रपरिवाराच्या संगतीत आगामी वर्षात पदार्पण करण्यासाठी शहरवासी आणि व्यावसायिक दोहोंनी जोरदार तयारी केली आहे. शहरातील विविध दुकाने, हॉटेल्स, मॉल्समध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून, सर्वत्र "हॅपी न्यू इयर'च्या फिव्हर दिसून येत आहे. 

औरंगाबाद : सरत्या वर्षाला रामराम ठोकून नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. मित्रपरिवाराच्या संगतीत आगामी वर्षात पदार्पण करण्यासाठी शहरवासी आणि व्यावसायिक दोहोंनी जोरदार तयारी केली आहे. शहरातील विविध दुकाने, हॉटेल्स, मॉल्समध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून, सर्वत्र "हॅपी न्यू इयर'च्या फिव्हर दिसून येत आहे. 

"थर्टी फर्स्ट' यादगार करण्यासाठी तरुणाईचे तर गेल्या आठवडाभरापासून भन्नाट सेलिब्रेशन प्लॅन्स आखणे सुरू आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक छोट्या-मोठ्या हॉटेल्समध्ये डान्स फ्लोअर, ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आले आहेत. शहरातील पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌, लॉन्स, क्‍लब, ढाब्यांवर सध्या "थर्टी फर्स्ट नाईट सेलिब्रेशन'ची जय्यत तयारी सुरू आहे. अगदी दोनशे रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंतचे दर त्याकरिता आकारण्यात आले आहेत. 

शहराला लागून असलेल्या ढाब्यांवर होणारी गर्दी पाहता अधिकचे शाकाहारी-मांसाहारी पदार्थ तयार करण्याच्या आगाऊ ऑर्डर दिल्या आहेत. 

तरुणाई काय म्हणते... 
"नको फार थंडी आहे, घरीच साजरा करू...', "नाही राव, मस्त बीड बायपासवर एखादा ढाबा गाठू...', "टेन्शनच नको. शेतावर मस्तपैकी रात्रभर थर्टी फर्स्ट साजरा करता येईल...' "म्हैसमाळ कैसा रहेगा?', "एक काम करते है! इस बार फाईव्ह स्टारका डीजे एन्जॉय करते है!' सध्या जळीस्थळी अशा चर्चेला उधाण आले आहे. कॉलेज कट्ट्यावर "शहरात नको, या वेळेस शहराबाहेरच' असे म्हणणारा एक गट आहे, तर दुसरा "शहरातच एन्जॉय करू' म्हणणारा आहे. 

पार्टी स्पॉट 
कॅनॉट प्लेस, सूतगिरणी चौक, बीड बायपास, निराला बाजार, जळगाव रोड, चिकलठाण, शिवाजीनगर, पडेगाव, सावंगी बायपास येथील हॉटेल्स, कॅफे, ढाबे तरुणाईचे पार्टी स्पॉट म्हणून गजबजणार आहेत. 

राज्य उत्पादन शुल्क सज्ज 
विनापरवाना दारू पिणारे, अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेल, ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार आहे. थर्टी फर्स्टसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांनी दिली. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त 
थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. चौकाचौकांत मद्यपी चालकांची तपासणी केली जाणार असून, "थर्टी फर्स्ट'निमित्त कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. शहरवासीयांनीदेखील नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत करावे, असे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: bye bye to 2018 welcome of new year