लोकसभेत बोलण्याची हिंमत होत नाही : सुशीलकुमार शिंदे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

आम्ही "सर्जिकल स्ट्राइक' केला पण, कधी बाजार मांडला नाही. कॉंग्रेसने अणुचाचणी घेतली, बॅंकांचे राष्ट्रीयकरण केले, मतदानासाठी यंत्र यासह कितीतरी ठोस कामे कॉंग्रेसच्या काळात झाली. आता मात्र घोषणा करून जनतेची फसवणूक केली जात आहे.''

उस्मानाबाद : लोकसभेची निवडणूक जिंकताच संसदेच्या पायरीवर डोके ठेवून नतमस्तक होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता त्याच संसदेची विटंबना करीत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर लोकसभेत येऊन बोलण्याची त्यांची हिंमत होत नसल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारार्थ उपळा मा (ता. उस्मानाबाद) येथे मंगळवारी झालेल्या सभेत शिंदे बोलत होते. ते म्हणाले, ""संसदेत पहिल्यांदा प्रवेश करताना पंतप्रधान मोदी यांनी पायरीवर डोके ठेवून नमन केले होते. त्यानंतर अडीच वर्षांच्या कालावधीत हेच मोदी लोकसभेत येऊन बोलायला घाबरत आहेत. ऊठसूट कोणत्याही बाबीची जाहिरातबाजी करण्यावर भर दिला जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरात सुमारे सव्वाशे जणांचे प्राण गेले. याला जबाबदार कोण?

काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. खात्यात पैसे जमा झाले का?

फसवणूक करून सत्तेवर येणाऱ्या पक्षाला मते देऊ नका, कॉंग्रेस हाच विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार पक्ष असल्याने साथ द्या. आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांची संस्कृती हातावर रोटी घेऊन जेवण्याची आहे, असे सांगून शिंदे यांनी येणेगुर (ता. उमरगा) येथील भोजना वेळी सोन्याच्या किंवा सोनेरी मुलामाही दिलेल्या ताट- वाट्या नव्हत्याच, असे स्पष्ट सांगितले. माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता शहापूरकर, माजी जिल्हाध्यक्ष विश्‍वास शिंदे, विक्रम पडवळ आदी उपस्थित होते.

Web Title: can not dare to speak in loksabha, says sushil kumar shinde