कर्जवसुलीच्या नोटिसा रद्द करा - डॉ. दीपक सावंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

उस्मानाबाद - जिल्ह्यात सरतेशेवटी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्तांना पीकविम्याची रक्कम मिळण्याची कारवाई करावी; तसेच जिल्हा बॅंकेने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसा रद्द कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केल्या.

उस्मानाबाद - जिल्ह्यात सरतेशेवटी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्तांना पीकविम्याची रक्कम मिळण्याची कारवाई करावी; तसेच जिल्हा बॅंकेने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसा रद्द कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी (ता.२२) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस आमदार मधुकर चव्हाण, राणाजगजितसिंह पाटील, सुजितसिंह ठाकूर, ज्ञानराज चौगुले व राहुल मोटे, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारवनरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांची उपस्थिती होती.

जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ मधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांचा नोव्हेंबरअखेर झालेल्या खर्चाचा आढावा पालकमंत्री डॉ. सावंत यांनी घेतला. जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ मधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांच्या पुनर्विनियोजनाच्या एकूण एक हजार ७७० लाख निधीस मंजुरी देण्यात आली. २०१७-१८ मधील जिल्हा वार्षिक सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजनानिहाय प्रारूप आराखड्यास या वेळी मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना २०१६-१७ साठी सहा हजार २९२ लाख निधी मंजूर असून त्यापैकी चार हजार ९२४ लाख निधी खर्च झाला आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेसाठी मंजूर २१५.५७ लाखपैकी २७.८३ लाख निधी आतापर्यंत खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी दिली. मार्च २०१७ पर्यंत शंभर टक्के निधी खर्च करण्याची सूचना डॉ. सावंत यांनी केली. 

जिल्ह्यात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आदींबाबत चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण करणे आवश्‍यक आहे. पॉलीहाऊस, शेडनेट, शेततळे, कांदाचाळीबाबत कृषी विभागाकडे प्राप्त प्रस्तावांवर कारवाई करुन संबंधित शेतकऱ्यांना निधी वितरित करावा, जिल्हा बॅंकेने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसा तत्काळ रद्द कराव्यात, ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसवून द्यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या कसबे तडवळे येथील शाळेत डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याबाबत समाजकल्याण विभागाशी समन्वय साधून कारवाई करावी, अशा सूचना डॉ. सावंत यांनी केल्या.

Web Title: Cancellation notices to loan recovery