नेत्यांचा सभांवर तर उमेदवारांचा गाठीभेटींवर भर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

उस्मानाबाद - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारास आता वेग येत आहे. सर्वच पक्षांनी गटनिहाय प्रचारसभांवर भर दिला आहे. नेते सभा घेत आहेत तर उमेदवार गट व गणातील गावनिहाय जाऊन डोअर टू डोअर प्रचार करीत आहेत. सभांमधून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. 

उस्मानाबाद - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारास आता वेग येत आहे. सर्वच पक्षांनी गटनिहाय प्रचारसभांवर भर दिला आहे. नेते सभा घेत आहेत तर उमेदवार गट व गणातील गावनिहाय जाऊन डोअर टू डोअर प्रचार करीत आहेत. सभांमधून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. 

जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी आणि आठ पंचायत समित्यांच्या 110 गणांसाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजप हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे सातच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या चारही पक्षांच्या जिल्हा व तालुकास्तरीय नेत्यांची प्रचारासाठी धावपळ सुरू आहे. सकाळी आणि सायंकाळी गटांत तर काही ठिकाणी गणांमध्ये नेत्यांच्या सभा होत आहेत. उमेदवार मात्र मतदारांच्या गाठीभेटीवरच भर देत आहेत. दिवस कमी व गावे जास्त असल्याने अनेक उमेदवारांची मदार आपल्या पक्षाच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांवरच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत वेगाने प्रचार करावा लागत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गटनिहाय सभा घेण्यावर भर दिला आहे. दररोज किमान तीन ते चार गटांमध्ये त्यांच्या सभा होत आहेत. याशिवाय जिल्हास्तरावरील प्रमुख कार्यकर्तेही सभांवर जोर देत आहेत. शिवसेनेसाठी जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही प्रचारसभा, पदयात्रांवर भर आहे. भाजप उमेदवारांसाठी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद पाटील, नितीन काळे आदींनी सभा घेण्यावर भर दिला आहे. कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील यांनी गटनिहाय सभा घेण्यावर भर दिला आहे. आमदार बसवराज पाटील हे स्टार प्रचारक असल्याने ते हेलिकॉप्टरने फिरून सभा घेत आहेत. 

कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेसच्या तर सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींनी जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. 

Web Title: Candidates with an emphasis on visit