हरवली पर्स; सापडली माणुसकी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

वाशीम जिल्ह्यातील वाहन चालकाचा प्रामाणिकपणा 

औरंगाबाद - सिडको बसस्थानकावर एका खासगी वाहन चालकाला महिलेची बेवारस पर्स सापडली. त्यात 16 हजार 700 रुपये रोख होते. त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत ही पर्स बसस्थानकामध्ये जमा केली. त्यानंतर संबंधित महिलेला ती परत करण्यात आली. त्यामुळे हरवली पर्स; सापडली माणुसकी याचाच प्रत्यय यानिमित्त आला. 

खासगी वाहनावर चालक म्हणून काम करणारे सुधाकर उमाजी काळे (रा. भर जहागीर जि. वाशीम) हे चारचाकी वाहन घेऊन सोमवारी (ता. 14) औरंगाबाद येथे आले होते. वेळ असल्यामुळे सायंकाळी पाच वाजता ते सिडको बसस्थानकावर गेले. यावेळी फलाट क्रमांक दोनवर एक पर्स त्यांना सापडली. त्यांनी ही पर्स बसस्थानकाच्या चौकशी कक्षातील कर्मचाऱ्याकडे जमा केली. कर्मचाऱ्याने पर्स उघडून पाहिली असता त्यात 16 हजार 700 रुपये निघाले. तसेच महिलेचे आधार कार्ड व इतर कागदपत्रे आढळली. याचवेळी एक
भांबावलेल्या अवस्थेतील महिला काही तरी शोधत असल्याचे श्री. काळे यांच्या लक्षात आले. त्यांनी महिलेला "ताई काय शोधता?'' अशी विचारणा केली असता, माझी पर्स हरवली असल्याचे तिने सांगितले. काळे यांनी महिलेला बसस्थानकातील चौकशी कक्षामध्ये नेले. महिलेला पर्स संदर्भात पुराव्याची विचारणा केली असता. तिने सांगितलेले मनीषा रमेश जायभाये
(रा. निमगाव गुरू ता. जि. बुलडाणा) या नावाचे आधार कार्ड पर्समध्ये आढळून आले. ओळख पटताच महिलेला रक्कमेसह पर्स सुपूर्द करण्यात आली. 
 
पोलिसांनी केले कौतुक 
श्री. काळे यांना पाचशे रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. यावेळी काळे यांचा प्रामाणिकपणा पाहात बसस्थानकातील कर्मचारी व पोलिसांनी त्यांचे कौतुक केले तर मनीषा जायभाये यांनी त्यांचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car driver honesty at Aurangabad