कारवड आढळली मयत, बिबट्याचा वावर असल्याची चर्चा

3
3

पूर्णा ः फडशा पाडलेली कारवड आढळल्यानंतर महागाव (ता.पूर्णा) परिसरात बिबट्याचा वावर असल्याची भितीयुक्त चर्चा तालुक्यात आज दिवसभर पहावयास मिळाली. 

महागाव शिवारात मारोती बापूराव मोहिते यांची कारवडीचा वन्य प्राण्याने फडशा पाडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. समाजमाध्यमातून सर्वत्र ही बातमी पोहचली व तालुक्यात बिबट्या आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.

परिसरात लावले ट्रॅप कॅमेरे   
विभागीय वन अधिकारी कामाजी पवार व वन परिक्षेत्र अधिकारी जयसिंग कच्छवे यांनी या बाबीची तत्काळ दखल घेत वन परिमंडळ अधिकारी काशीनाथ भंडारे, सुरेखा नरवाडे, रामा राठोड, लक्ष्मण राठोड व सुरेश सावंत यांचे पथक या भागात पाचारण केले. या पथकाने परिसरात कसून पाहणी केली. परंतू, जमिनीत ओलसरपणा नसल्याने वन्य प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत. वन परिमंडळ अधिकारी काशीनाथ भंडारे यांनी ही माहिती देत हा हल्ला वन्य प्राण्यानेच केल्याचे सांगत, तो प्राणी नेमका कोणता या बाबतीत सुगावा लागला नसल्याचे सांगितले. त्याचा तपास करण्यासाठी या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती त्यांनी ‘सकाळ’ला दिली. 
पथक या परिसरात शोध घेत असून जनतेने काही दिवस शेतातील आखाड्यावर उघड्यावर झोपू नये व जनावरे मोकळ्या ठिकाणी बांधू नयेत, आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांनी केले.

हिंस्र प्राण्याने दोन शेळ्या केल्या फस्त 
गंगाखेड ः तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रामकिशन सोडगीर यांच्या दोन शेळ्या परिसरात चरण्यासाठी गेल्या असता हिंस्त्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला चढवत शेळ्या फस्त केल्याची घटना (ता.१८) रोजी घडली. जालना, बीड, उस्मानाबाद परिसरात बिबट्याने धुमाकूळ माजवला असतानाच तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रामकिशन गुंडीबा सोडगीर यांच्या दोन शेळ्या परिसरात चरत असताना हिंस्र प्राण्याने शेळ्यांचा बळी घेतला. यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरात फिरणाऱ्या हिंस्त्र प्राण्याचा तत्काळ शोध वनविभागाने घ्यावा, अशी मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विभागीय वन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या परिसरात प्रथमदर्शनी पाहणी केली असता हा हल्ला बिबट्याने केलेला नसून इतर हिंस्र प्राण्याने केलेला आहे. शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असे विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांनी सांगितले. 
 
हेही वाचा - नांदेड : समाजातील पाश्चात्य संस्कृतीचेही अनुकरण थांबवावे - दत्तु डहाळे

खदानीच्या पाण्यात बुडून पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू 
मानवत ः खदाणीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. शहरातील केकेएम महाविद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या एका खदानीत पवन सिताराम कोकरे (रा.बर्गी मोहल्ला, मानवत) हा आपल्या मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. परंतू, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडुन त्याचा मृत्यू झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.  

 
संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com