
हिंगोली : महिलेला तलवारीने मारहाण करणाऱ्या आकरा जणांवर गुन्हा दाखल
वसमत - वसमत शहरातील मुस्कान फंक्शन हॉल च्या मागे एका महिलेस तलवारीने मारहाण करून जखमी करणाऱ्या आकरा जणांवर वसमत शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ता. ६ सकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत शहरातील मुस्कान फंक्शन हॉलच्या पाठीमागे राहणाऱ्या ज्योती कदम यांचा भाऊ प्रेम व त्याच भागात राहणारा शेख सरफराज याचे मामा चौकात भांडण झाले होते. त्यानंतर गुरुवारी ता. ५ रात्री पुन्हा हा वाद उफाळून आला. शाब्दिक चकमकीनंतर मारहाणीला सुरुवात झाली. यावेळी आकरा जणांनी ज्योती कदम यांना तुम्ही येथे का राहाता या ठिकाणी धार्मिक स्थळ बांधायचे आहे असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करून तलवारीने मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. सदरील भांडण सोडवण्यासाठी काही जण मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण झाली.
या प्रकरणात ज्योती कदम यांनी आज पहाटे वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शेख फिरोज, शेख असिफ, शेख सोनू, शेख सरफराज, शेख सोहेल, शेख चाऊस यांच्यासह पाच जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सोबतच आर्म एक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपाधीक्षक किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कदम, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.
Web Title: Case Registered Against 11 Who Beat Woman With Sword
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..