सचिन वाघ आत्महत्या प्रकरणी प्राचार्यासह शिक्षिकेवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

सचिन वाघ आत्महत्या प्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यासह शिक्षिकेविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 11) दिडच्या सुमारास गुन्हा दाखल झाला.

औरंगाबाद - महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षेत कॉपी करताना पकडलेल्या सचिन वाघ (वय 19) याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणात प्राचार्यासह शिक्षिकेविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 11) दिडच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. अशी माहिती पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली. 

एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात मंगळवारी (ता. 10) सकाळी कॉपी पकडल्यानंतर सव्वाअकराच्या सुमारास सचिन वाघ या विद्यार्थाने पाचव्या मजल्यावरून उडी मारली. यात  सचिनचा बुधवारी (ता. 11) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास मृत्यू झाला. यानंतर महाविद्यालायच्या जबाबदार व्यक्तिविरुद्ध गुन्हा नोंदवावा अशी मागणी मृताच्या वडिलांनी केली. याच मागणीसाठी एमआयटीच्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून सातारा पोलिस ठाण्यावर दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा काढला.  जमाव पोलिस ठाण्यात जमला व महाविद्यालय प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी सुरु केली. यानंतर सचिनचे वडील सुरेश माधवराव वाघ यांचा सविस्तर जबाब घेतला, त्यांच्या तक्रारीनुसार, या प्रकरणात प्राचार्या हेलन राणी व शिक्षिका रचना मोरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 306 (34) नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला, असे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In the case of Sachin Vagh suicide a teacher has been lodged with the Principal