बॅंकेतून बाहेर गेलेला पैसा परतच येईना! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

लातूर - नोटाबंदीनंतर नव्या नोटा येऊन व्यवहाराला सुरवात झाली तरी चलन तुटवड्याचा प्रश्न कायम आहे. महिनाभरापासून शहरातील एटीएम बंद पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातूनच मिळेल तेवढे पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी बॅंकेत तोबा गर्दी केली आहे. बॅंकेतून बाहेर गेलेला पैसा पुन्हा बॅंकेत परतच येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

लातूर - नोटाबंदीनंतर नव्या नोटा येऊन व्यवहाराला सुरवात झाली तरी चलन तुटवड्याचा प्रश्न कायम आहे. महिनाभरापासून शहरातील एटीएम बंद पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातूनच मिळेल तेवढे पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी बॅंकेत तोबा गर्दी केली आहे. बॅंकेतून बाहेर गेलेला पैसा पुन्हा बॅंकेत परतच येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश एटीएम सध्या बंद आहेत. या स्थितीत बॅंकेतून ठराविक रक्कम ग्राहकांना देण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांनी रोजच्या आर्थिक गरजा भागवण्याकरिता बॅंकांतून पैसे काढण्यासाठी गर्दी केली असून बॅंकेत ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत उमेदवारांनी निवडून येण्यासाठी मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्याची चर्चा झाली. मताचा भाव पाचशे ते अडीच हजार रुपयापर्यंत गेल्याचा बोलबालाही झाला. या स्थितीत बॅंकेत ठणठणाट असताना उमेदवारांकडे कोठून पैसे आले, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. भारतीय स्टेट बॅंकेकडून अन्य बॅंकांना चलन पुरवठा करण्यात येतो. या बॅंकांकडे जमा झालेले चलन स्टेट बॅंकेकडे जमा करण्यात येते. मात्र, बॅंका स्वतःच्या व्यवहाराची गरज भागविण्यासाठी स्टेट बॅंकेकडे चलन जमा करत नसल्याची स्थिती आहे. बॅंकांतूनही चलन बाहेर जाण्याचे प्रमाण जास्त असून परत येण्याचे प्रमाण कमी आहे. यात रिझर्व्ह बॅंकेकडून चलन पुरवठा बंद झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. काही भागात दहा रूपयाचे नाणे बंद पडल्याच्या अफवेने व्यवहारावर परिणाम झाला आहे. 

खरे काय ते सांगा? 
मागील आठवड्यात येथे आलेले उस्मानाबादचे खासदार प्रा. रवी गायकवाड यांनाही एटीएममध्ये पैसे नसल्याचा फटका बसला. त्यांनी एटीएमसमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पैसे भरण्यात आले. या वेळी त्यांनी बॅंक अधिकाऱ्यांना चलन तुटवड्याचे खरे कारण सांगण्याचा आग्रह धरला. मात्र, अधिकाऱ्यांना वरूनच चलन तुटवड्याचे एकच कारण सांगत होते. नोटाबंदीनंतर बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी जुन्या नोटा बदलून नव्या देण्यासाठी गैरप्रकार केले होते. यामुळे मोजक्‍याच व मोठ्या ग्राहकांना पाहिजे तेवढे चलन देऊन बॅंका ग्राहकांना वेठीस धरत असल्याचाही संशय आहे. दरम्यान, पंधरा दिवसात एटीएम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे विष्णूपंत साठे, राज गाडे, रमेश माळी व सिद्धेश्वर जाधव यांनी दिला आहे.

Web Title: Cash problem in latur