कॅशलेसला अडथळा इंटरनेटचा!

अभिजित हिरप
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात हवे एटीएम, स्वाईप मशीन

ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात हवे एटीएम, स्वाईप मशीन

औरंगाबाद - हजार, पाचशे रुपयांच्या नोटाबंदीपासून कॅशलेस भारताबद्दल चर्चेला उधाण आलेले आहे; मात्र इंटरनेटची अपुरी कनेक्‍टिव्हिटी, एटीएमची तोकडी संख्या आणि स्वाईप मशीन खेड्यात न पोहोचणे, हे कॅशलेस भारतातील सर्वांत मोठे अडथळे आहेत. गेल्या पाच वर्षांत इलेक्‍ट्रॉनिक बॅंकिंग, एटीएम, क्रेडिट/डेबिट कार्ड आणि स्वाईप मशीनच्या वापरात लक्षणीय वाढ झाली. एका अहवालानुसार, भारतात दैनंदिन रोख व्यवहारासाठी २०१३ मध्ये ९५ टक्‍के, तर हेच प्रमाण २०१६ मध्ये ६८ टक्‍के इतके झाले. यापुढे कॅशलेस होण्यासाठी भारताला प्रामुख्याने चार अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. 

सर्वात पहिला अडथळा म्हणजे, बॅंकांमार्फत होणाऱ्या नॅशनल इलेक्‍ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (एनईएफटी) आणि रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस)द्वारे व्यवहारांमध्ये २०११ पासून ऑक्‍टोबर २०१६ पर्यंत अनुक्रमे पाचपट व ७० टक्‍क्‍यांनी वाढ झाली. आरटीजीएसला किमान २ लाख रुपये, तर एनईएफटीला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. एनईएफटीद्वारे २०११ मध्ये १९९ दशलक्ष, तर ऑक्‍टोबर २०१६ मध्ये १.१९ अब्ज इतके व्यवहार झाले. याचदरम्यान आरटीजीएस ५११ दशलक्षांहून ८६४ दशलक्ष इतके इलेक्‍ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर झाले; मात्र खेड्यांत राहणाऱ्या ८३३ दशलक्ष लोकसंख्येपैकी केवळ १०८ दशलक्ष, म्हणजेच केवळ १३ टक्‍के लोकसंख्येकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नोटबंदीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसलेला आहे. डिसेंबर २०१६च्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, ७३ टक्‍के भारतीय इंटरनेट सुविधा वापरू शकत नाहीत.

रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार, ऑक्‍टोबर २०१६च्या आकडेवारीनुसार क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वाईप करण्यासाठी केवळ १४ लाख स्वाईप मशीन, तर दोन लाख एटीएम आहेत. सर्वांत मोठे एटीएमचे जाळे असणाऱ्या एकट्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने गेल्या चार वर्षांत २६ हजारांहून अधिक एटीएम सुरू केले. हे प्रमाण एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्‍सिस आणि कोटकच्या एकत्रित आकडेवारीपेक्षा चारपट अधिक आहे. नुकतीच सरकारने १० लाख नव्या स्वाईप मशीन बसविण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे २०१४ च्या आकडेवारीनुसार, एक लाख लोकसंख्येमागे जागतिक स्तरावर एटीएमची संख्या ४४ एवढी आहे. भारतात एटीएमची संख्या जागतिक सरासरीपेक्षा अडीचपटीने कमी आहे. चीन आणि रशियामध्ये दशलक्ष लोकसंख्येमागे चार हजार स्वाईप मशीन आहेत. त्याशिवाय जपान, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये एक लाख लोकसंख्येमागे शंभराहून अधिक एटीएम आहेत. त्यामुळे एक लाख लोकसंख्येमागे मोठ्या प्रमाणात एटीएम मशीन उभारणे, हे भारतासमोर मोठे आव्हान आहे.

रिझर्व्ह बॅंकेनुसार २०११ ते २०१६ दरम्यान डेबिट कार्डमध्ये १७० टक्‍के, तर क्रेडिट कार्डमध्ये ५० टक्‍के वाढ झाली. २०११ मध्ये १७.७ दशलक्ष असलेली क्रेडिट कार्डची संख्या ऑगस्ट २०१६ मध्ये २६.४ दशलक्ष एवढी झाली. याच काळात डेबिट कार्डची संख्या २६३ दशलक्षांहून वाढून ७१२ दशलक्ष एवढी झाली; मात्र उच्च उत्पन्न असलेल्या ३५ देशांतील ५३ टक्‍के लोकांकडे क्रेडिट कार्ड आहे. भारतात हेच प्रमाण २.१ टक्‍के इतके आहे.

२००८ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीनंतर क्रेडिट कार्ड वापणाऱ्यांच्या संख्येला मोठा ब्रेक लागला. डेबिट कार्डचा वापर केवळ बॅंकांतील पैसे काढण्यासाठी केला जातो. केवळ शहरी भागात डेबिट कार्डद्वारे पेमेंट केले जाते. मार्च २०१६च्या आकडेवारीनुसार २०१५-१६ या आर्थिक वर्षात एटीएममधून २५ लाख कोटी रुपये काढले गेले. तर स्वाईप मशीनमधून केवळ ३.९ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

भारतात २०१२ ते २०१६ दरम्यान मोबाईल बॅंकिंगद्वारे रकमेनुसार २५ टक्‍क्‍यांची वाढ झाली. ६०० दशलक्ष मोबाईल यूजर्सनी २०१२ मध्ये ४,१८५ अब्ज, तर २०१६मध्ये ५,२४३ अब्जाचे व्यवहार केले आहेत. यादरम्यान व्यवहाराच्या संख्येत केवळ २.२ टक्‍के वाढ झाली; पण भारतामध्ये इंटरनेट सुविधा बांगलादेश आणि चीनच्या तुलनेतदेखील अत्यंत कमी आहे.

त्याशिवाय एका अहवालानुसार, १७ टक्‍के प्रौढ लोकसंख्या स्मार्टफोन वापरत नाहीत. मार्च २०१६ पर्यंत ट्रायच्या आकडेवारीनुसार, ९३० दशलक्ष मोबाईल वापरकर्त्यांपैकी केवळ १५४ दशलक्ष (१६.५ टक्‍के) जणांकडे इंटरनेट कनेक्‍शन आहे. मोबाईल बॅंकिंग वापरण्यातील दुसरा मोठा अडथळा म्हणजे, एखादे पेज उघडण्यासाठी भारतात सरासरी वेळ साडेपाच सेकंद इतका लागतो. चीनमध्ये केवळ २.६ सेकंद, श्रीलंकेत ४.५ सेकंद आणि बांग्लादेशात ४.९ सेकंद इतका वेळ लागतो.

Web Title: cashless problem by internet