कॅशलेस व्यवहारासाठी बॅंका सरसावल्या

कॅशलेस व्यवहारासाठी बॅंका सरसावल्या

पावणेदोन लाख ग्राहकांना चेकबुक, सव्वातीन लाख एटीएम देणार

विकास गाढवे
लातूर - नोटाबंदीनंतर उद्‌भवलेल्या अभूतपूर्व चलन तुटवड्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारसह सर्वच यंत्रणांकडून कॅशलेस व्यवहारासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र, सुविधा नसल्यामुळे ग्राहकांचा त्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे कॅशलेस व्यवहारासाठी जिल्ह्यातील बॅंका सरसावल्या असून कॅशलेससाठी लागणाऱ्या विविध सुविधा ग्राहकांना देण्यासाठी बॅंका पुढाकार घेणार आहेत. 

येत्या तीन महिन्यात बॅंकांकडून जिल्ह्यातील पावणेदोन लाख ग्राहकांना चेकबुक तर सव्वातीन लाख ग्राहकांना एटीएमची सुविधा देण्यात येणार आहे. कॅशलेस चळवळीसाठी शनिवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध बॅंक प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी अरुण महाजन, भारतीय स्टेट बॅंकेचे सहायक महाप्रबंधक ध्रुवकुमार बाळ व महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे सहायक महाप्रबंधक ए. आर. श्रेष्ठ यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत उपलब्ध चलन व येत्या काळात चलन तुटवड्यावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा झाली. यातूनच कॅशलेस व्यवहारासाठी बॅंकांनी ग्राहकांना प्रवृत्त करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तीन महिन्यांसाठी निश्‍चित उद्दिष्ट घेऊन कामाला लागण्याचा निर्णयही झाला. यातूनच कॅशलेस व्यवहारासाठी ग्राहकांना लागणाऱ्या सुविधा तातडीने देण्याची सूचना श्री. महाजन यांनी केली. कॅशलेस व्यवहारासाठी सध्या धनादेशांची (चेकबुक) मोठी मागणी आहे. मात्र, त्याची पूर्तता बॅंकांकडून तातडीने केली जात नाही. व्यवहारासाठी डेबिट कार्ड स्वाईप करून स्वाईप मशीनलाही मोठी मागणी आहे. मात्र, त्यासाठी अनेक व्यावसायिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देताना आवश्‍यक सुविधांसोबत ग्राहकांना सुविधांचा वापर करण्यासाठीही प्रशिक्षण देण्याची गरज आहे. बॅंकांनी त्यासाठीही पुढे येण्याचे आवाहन श्री. महाजन यांनी बैठकीत केले.

जिल्ह्यातील सर्व बॅंकांत मिळून सध्या २७ लाख ४२ हजारहून अधिक ग्राहक असून त्यापैकी २३ लाख ६८ हजार ग्राहकांकडे कॅशलेस व्यवहाराच्या चेकबुक, एटीएम, इंटरनेट व मोबाईल बॅंकिंग, स्वाईप मशीन तसेच इ-व्हॅलेट आदी सुविधा आहेत. येत्या मार्चअखेर वाढीव ग्राहक संख्या गृहीत धरून आठ लाख ६५ हजार पाचशे ग्राहकांना या सुविधा देण्याचे उद्दिष्ट बॅंकांनी ठेवल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

उपलब्ध सुविधा व तीन महिन्यांतील उद्दिष्ट
सुविधेचे नाव     सुविधा उपलब्ध असलेल्या     तीन महिन्यांसाठी
ग्राहकांची संख्या    ग्राहकांचे उद्दिष्ट

चेकबुक     ६३१०००     १७२०००
एटीएम     ९५१०००     ३१७०००
इंटरनेट बॅंकिंग     २०००००     ११८०००
मोबाईल बॅंकिंग     २१५०००     १२५०००
स्वाईप मशिन     १५४६     ५५००
इवॉलेट व अन्य सुविधा     ३७००००     १२८०००
एकूण     २३६८५४६     ८६५५००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com