परळी शहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

शहरात प्रमुख रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. मुख्य रस्त्यावरील, बाजारपेठेतील पार्किंग सम-विषम तारखेनुसार करणे आवश्‍यक आहे.
-मंगेश भोयटे, युवक

परळी वैजनाथ - शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी व शहराच्या सुरक्षिततेसाठी आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग व औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी शहरात गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी व शहराच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरात महत्त्वाच्या ठिकाणी, शहरातील प्रवेशद्वार असलेल्या चौकात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येत आहे. यासाठी जवळपास एक कोटी २० लक्ष रुपये खर्च करण्यात येत आहेत. ही यंत्रणा महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सुरू होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभी केली जात आहे; तसेच शहरात मागच्या अनेक वर्षांपासून सिंगलची यंत्रणा जी धूळखात पडून आहे तीसुद्धा या पद्धतीने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील मध्यवर्ती चौकात उलट्या दिशेने जाण्यामुळे होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे. शहरातील सर्वांत मध्यवर्ती असलेल्या राणी लक्ष्मीबाई चौकात दर दोन दिवसांनी तीन ते चार अपघात उलट्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांमुळे होत असतात. शहरातील वाहतूक शाखा कधीही याकडे लक्ष देत नाही. शहरात मुख्य रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असते. दुचाकीस्वार भर रस्त्यावर दुचाकी पार्किंग करून आपली कामे करत असतात. सतत वाहतूक कोंडी होत असते. मुख्य रस्त्यावर म्हणजे स्टेशन रस्ता तसेच स्टेट बॅंक ऑफ इंडियासमोर बेशिस्तपणे रस्त्यावर दुचाकी, चारचाकी पार्किंग केलेली असते. काही वर्षांपूर्वी पोलिस निरीक्षक निघोट यांनी या प्रमुख रस्त्यावर सम-विषम तारखेला दुचाकी, चारचाकी पार्किंगची व्यवस्था केली होती. श्री. निघोट यांची बदली होताच पुन्हा पहिले पाढेपंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना कोण सोडवणार, वाहतूक शाखेला कधी जाग येणार? स्थानिक पोलिस प्रशासन लक्ष देत नाही.

शहरात प्रमुख रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. मुख्य रस्त्यावरील, बाजारपेठेतील पार्किंग सम-विषम तारखेनुसार करणे आवश्‍यक आहे.
-मंगेश भोयटे, युवक

Web Title: CCTV cameras in Parli city