शहर सुरक्षेला पंधराशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

औरंगाबाद - अद्ययावत प्रणाली व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात आठशे चौकांत सुमारे पंधराशे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या जून-जुलैदरम्यान यासंबंधी निविदा निघणार असून, वर्षभरातच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी (ता. 10) दिली.

औरंगाबाद - अद्ययावत प्रणाली व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात आठशे चौकांत सुमारे पंधराशे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या जून-जुलैदरम्यान यासंबंधी निविदा निघणार असून, वर्षभरातच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी (ता. 10) दिली.

स्मार्ट सिटीत औरंगाबादचा समावेश झाल्यानंतर आता शहरातील सुरक्षेसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंबंधी मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही घोषणा केल्या होत्या. तसेच ट्‌विटरवरूनही माहिती दिली होती. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले, 'शहरातील आठशे चौकांत उच्च क्षमता व दर्जेदार असे पंधराशे कॅमेरे बसवले जातील. स्मार्ट सिटीअंतर्गत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प औरंगाबादेत उभा राहणार आहे.'' सेफ सिटीअंतर्गत शहरात पन्नास व कार्यालयात दोन असे बावन्न कॅमेरे बसवण्यात आले. परंतु यातील बहुतांश बंद असतात. त्यामुळे अनेक गुन्हे प्रकरणात सीसीटीव्हीत संशयित कैदच झाले नाहीत. शिवाय शहर सुरक्षेला खिंडार पडल्याच्या घटना घडल्या. शहरात पंधराशे कॅमेरे बसविण्यात आल्यास आमूलाग्र बदल होतील. स्मार्ट सिस्टीम तयार होऊन रस्त्यावर गुन्हे करणारे गुन्हेगार सुटणार नाहीत. गुन्हा करून पळणारा एकही संशयित सुटणार नाही, अशी उपाययोजना करण्यात येणार आहे.

नेमके काय होईल?
जून, जुलै महिन्यात निविदा प्रक्रिया, ऑगस्टमध्ये आठशे चौकांत कॅमेरे बसवले जातील.
ऑक्‍टोबरमध्ये सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कनेक्‍शन सेफ सिटी प्रकल्प कार्यालयात दिसेल.
मुंबई, ठाण्यात हा प्रकल्प पूर्णत्वास, नागपूरला काम सुरू, औरंगाबादेतही राहील प्रकल्प उभा.
लेटेस्ट टेक्‍नॉलॉजीतील कॅमेरे राहतील. ड्रोन कॅमेऱ्यांचीही टेहळणीसाठी मदत घेतली जाईल.
मोबाईल सर्व्हेलन्सचे जाळे गुन्हेगार, आरोपींचा माग काढण्यासाठी, शोधासाठी उपयोगात येईल.

असा होईल उपयोग...
सीसीटीव्हीच्या या प्रकल्पामुळे संपूर्ण महत्त्वाची ठिकाणे व शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत येईल.
संशयित वाहनांचा क्रमांक हे कॅमेरे टिपतील. संशयितांची ओळख पटवण्यासाठी कॅमेऱ्यांचा होणार मोठा उपयोग.
अलर्ट सिस्टिम : सायरन वाजवून एकाच ठिकाणाहून सर्व शहर अथवा हव्या त्या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देता येणार, घोषणा करता येणार.
नव्याने बांधल्या जाणाऱ्या कार्यालयात स्वतंत्र कंट्रोल रूम राहील. पोलिस अधिकारी घटनास्थळाची, घटनांची, माहितीची देवाणघेवाण करून नियंत्रण करू शकतील.
सीसीटीव्ही वॉररूममध्ये बसवण्यात येतील. त्यामुळे शहरातील घटना प्रत्यक्ष पाहून पोलिस आयुक्त हजर पोलिसांना मार्गदर्शन नियंत्रण-सूचना देऊ शकतील.
लाईव्ह टेलिकास्ट यंत्रणा : पोलिसांच्या वाहनांवर लक्ष देता येणार, वाहन घटनास्थळी पोचताच तेथील लाईव्ह टेलिकास्ट सीपी चेंबरमध्ये दिसू शकेल.

गुन्हेगारावर वचक बसेल
शहरातील 30 चौकांत 50 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यामुळे तीन खून, बारा जबरी चोऱ्यांच्या तपास प्रकरणात मदत मिळाली. नियम मोडणाऱ्या आठ हजार वाहनचालकांना घरपोच दंडाच्या पावत्या देण्यात आल्या. अनेक प्रकरणांत गुन्हेगारांपर्यंत पोचण्यासाठी कॅमेऱ्यांची मदत झाली. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या पंधराशे कॅमेऱ्यांमुळे शहराला सुरक्षेचे कवच प्राप्त होईल.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचा आराखडा तयार केला जात आहे. ऍटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नेशन, मोबाईल सर्व्हेलन्स युनिट व ड्रोन कॅमेरेही असतील.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त.

आठशे चौकांत टेहळणी
स्मार्ट सिटीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प
अद्ययावत प्रणाली, प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश
जूनमध्ये निविदा, डिसेंबरपर्यंत उद्दिष्ट

Web Title: CCTV security cameras cover five city