मुरूडवर आता सीसीटीव्हीची "नजर'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुरूड - जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या मुरूड (ता. लातूर) गावावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या संकल्पनेतील स्मार्ट पोलिस ठाण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी येथील क्षेत्र विकास समितीने पुढाकार घेऊन गावात प्रमुख 16 ठिकाणी हे कॅमेरे बसवले असून, त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (ता. सात) जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमात क्षेत्र विकास समितीने गरजू रुग्णांनी सुरू केलेल्या सहकारमहर्षी शिवाजीराव नाडे सेवाभावी रुग्णालयाचेही लोकार्पण होईल. सहकारमहर्षी नाडे यांनी क्षेत्र विकास समितीसह अन्य स्वयंसेवी व सहकारी संस्थांच्या माध्यमातून परिसराचा विकास केला. त्यांच्या नावाने सुरू होत असलेल्या रुग्णालयामुळे समाजसेवेचा त्यांचा वसा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे सुरू ठेवला आहे. मुरूडची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. साठ गावांचा रोजचा संपर्क व मोठी बाजारपेठ असलेल्या गावावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले होते. याच स्वरूपाची स्मार्ट पोलिस ठाण्याची संकल्पना पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांनी मांडली. यातून त्यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. येथेही त्यांची स्मार्ट पोलिस ठाण्याची संकल्पना तडीस नेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. संकल्पनेतील सीसीटीव्हीची गरज क्षेत्र विकास समितीने पूर्ण केली असून समितीचे सचिव प्रवीण पाटील यांनी त्यासाठी विशेष साह्य केल्याचे श्री. घोडके यांनी सांगितले. सीसीटीव्ही कार्यान्वित झाल्या असून, त्यांचे नियंत्रण पोलिस ठाण्यात आहे. सीसीटीव्ही व सेवाभावी रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रूरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशनराव नाडे, प्रवीण पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सीसीटीव्हीची संख्या वाढणार
गावातील सोनार व अन्य महत्त्वाच्या बाजारपेठेतील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येणार आहे. संबंधित व्यापारी असोसिएशनने एकत्र येऊन त्यासाठी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातूनच हे कॅमेरे बसवण्यात येत आहेत. यामुळे येत्या काळात सर्व गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येईल. मोठ्या संख्येने कोचिंग क्‍लासेस असलेल्या रस्त्यावरही लवकरच हे कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. घोडके यांनी सांगितले.

Web Title: cctv watch on murud