वन्यजीवांना पाण्यासाठी दिल्या सिमेंट टाक्‍या

संकेत कुलकर्णी
शनिवार, 4 मे 2019

औरंगाबाद : गौताळ्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जंगलांमध्ये वन्यजीवांवर पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने टाचा घासण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खारीचा वाटा म्हणून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील एक्‍सलाईज्‌ या आयटी कंपनीने वन विभागाला सिमेंटच्या टाक्‍या दिल्या आहेत.

गौताळा वन्यजीव अभयारण्य परिसरात जनावरांसह पक्ष्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतात. जंगलात पाणी न उरल्याने प्राणी गावाकडे मोर्चा वळवतात. वन विभागाने काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. तेथे टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. पण तरीही मोरांसारखे पक्षी, नीलगायी, हरणे आणि इतर छोट्या श्‍वापदांना पाणी कमीच पडते. टॅंकरने पाणी पुरवायचे म्हटले, तरी जागोजाग टाक्‍या बसवणे शक्‍य होत नाही. अशा अनेक भागांमध्ये वन्यजीवांना पाणी पुरवण्यासाठी काय करता येईल यावर एक्‍सलाईज्‌ कंपनीचा विचार सुरू असताना, पाण्यासाठी सिमेंटच्या टाक्‍या देण्याची संकल्पना वन्यजीव छायाचित्रकार रंजन देसाई यांनी मांडली. कंपनीचे संचालक प्रताप धोपटे यांनी ती उचलून धरली.

पहिल्या टप्प्यात 30 ते 40 लिटर क्षमतेच्या 10 टाक्‍या वन्यजीव विभागाचे गौताळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नाकर नागापूरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. आणखी 10 टाक्‍या खरेदी करण्यात आल्या असून, त्याही लवकरच जंगलात पाठवल्या जातील, असे कंपनीचे मनुष्यबळ अधिकारी राहुल मित्रा यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cement water tank for animals and birds at Aurangabad