मध्य मतदारसंघ भाजपसाठी सोडा

प्रकाश बनकर
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

भाजपतर्फे मध्य मतदारसंघासाठीचा बूथ प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. यात हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. 

औरंगाबाद : युतीमध्ये औरंगाबाद शहरातील मध्य मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्यावर आहे. असे असतानाही मध्य मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जात आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. 20) भाजपचे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यातर्फे मध्य मतदारसंघासाठीचा बूथ प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. यात हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. 

राज्यमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. भागवत कराड, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, बालहक्‍क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, प्रदेश प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, उपमहापौर विजय औताडे, अनिल मकरिये, कचरू घोडके, जालिंदर शेंडगे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा माधुरी अदवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. 
डॉ. कराड म्हणाले, ""मध्य मतदारसंघातून शिवसेनचा दोन वेळा पराभव झाला आहे, तर भाजपचे या मतदारसंघात चांगले काम आहे. यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा.'' कार्यक्रमाला जगदीश सिद्ध, सुरेंद्र कुलकर्णी, उत्तम अंभोरे, अमित लोखंडे, समीर राजूरकर पूनम बमणे, राजगौरव वानखेडे, पुष्पाताई रोजातकर उपस्थित होते. 
 
रहाटकर यांनी आयोजकांना सुनावले 

बूथ प्रमुखाच्या मेळाव्याचे सर्वांना निमंत्रण देण्यात आले. मेळाव्याचे पूर्वनिमंत्रण नसल्यामुळे महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर चांगल्याच नाराज झाल्या. आपली नाराजी त्यांनी आपल्या भाषणातून बोलूनही दाखवली. रहाटकर म्हणाल्या, ""केंद्रातील नेते शहरात आहेत किंवा नाही हे बघितले पाहिजे, शहरात आल्यावर कार्यक्रमाची माहिती दिली पाहिजे, असे खडे बोल त्यांनी सुनावले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central constituency leave for bjp