केंद्रीय पथकाने अंधारात बॅटऱ्याच्या प्रकाशात केली नुकसानीची पाहणी, राजेगावचा दौरा रद्द

अविनाश काळे
Monday, 21 December 2020

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शिवाराची तब्बल दोन ते अडीच महिन्यानंतर सोमवारी (ता.२१) सायंकाळी पावणे सात वाजता केंद्रीय पथकाने पाहणी केली.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शिवाराची तब्बल दोन ते अडीच महिन्यानंतर सोमवारी (ता.२१) सायंकाळी पावणे सात वाजता केंद्रीय पथकाने पाहणी केली. अतिवृष्टीच्या नुकसानीने शेतकऱ्यांसमोर अंधारमय संकट आल्यानंतर सरकारने केलीली मदत तुटपुंजी होती. केंद्रीय पथकाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागला. पाहणीचा मुहुर्तही ठरला. पण दौऱ्याच्या व्यस्त कार्यक्रमाने पथक यायला उशीर झाल्याने बॅटरीच्या प्रकाशात पाहणी करावी लागली.

 

 

 

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सास्तूर, राजेगाव शिवारातील नुकसानीची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी केंद्रीय पथकामार्फत पाहणी होईल असा शब्द दिला होता. दोन महिन्यानंतर का होईना पथक सोमवारी दाखल झाले. सकाळी अकरा वाजता पथक येण्याची वेळ होती. मात्र सांयकाळी साडेसहाला पथक आले. केंद्रीय वित्त व नियोजन विभागाचे यशपाल, वरिष्ठ अधिकारी तुषार व्यास यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. राहुल पाटील, दत्तात्रय सास्तुरकर, श्री. सुतार यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या, कुजलेल्या सोयाबीनची अवस्था प्रत्यक्षात दाखविली.

पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने जमीन खरडुन गेल्याने शेतीची नापिकीची अवस्था झाली आहे.  मिळालेली मदत मात्र अत्यंत तुटपुंजी असल्याची माहिती शेतकऱ्यांनी या वेळी दिली. पिक विम्याची रक्कमही अत्यल्प मिळते. त्यामुळे केंद्राकडून भरीव मदत मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्याकडे केली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पिक विमा कंपनीची नियमावली आणि शेतकऱ्यांची मूळ मागणी यात बरीच तफावत असल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीविषयी संभ्रम असल्याची माहिती पथकाला दिली.

 

 

 
 

या वेळी अपर विभागीय आयुक्त अविनाश पाठक, जिल्हा कृषी अधिकारी उमेश लाटगे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी डॉ.चिमन शेटी, तहसीलदार संजय पवार, डॉ.रोहन काळे, मंडळ अधिकारी एस. व्ही. साळूखे, तलाठी एस. व्ही. कोकाटे, कृषी सहायक दीपक जाधव, शेतकरी दत्तात्रय सास्तुरकर, शिवराज औसेकर,  प्रकाश औसेकर, कैलास मिटकरी, यशवंत देशमुख, रब्बानी नळेगावे, दयानंद स्वामी, शांतेश्वर स्वामी आदींची उपास्थिती होती.

राजेगावचा दौरा रद्द
सास्तुरचा दौरा अंधारातच झाल्याने राजेगावचा दौरा रद्द करुन पथक बलसूर मार्ग सोलापूरकडे रवाना झाले. अनेक शेतकरी नुकसानीपोटी मिळालेल्या तुटपुंजी मदतीविषयी खदखद पथकासमोर व्यक्त करणार होते. मात्र संधीच मिळाली नाही.
 

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Team Inspect Heavy Rain Hit Osmanabad District In Light Of Battery