केंद्रीय पथक जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पोचले अडीच तास उशिरा

आनंद इंदानी
Monday, 21 December 2020

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी (ता.२१) सकाळी केंद्रीय पथकातील त्रिसदस्यीय समिती बदनापूर तालुक्यातील वाकुळणी, बाजार वाहेगाव आणि रोषणगाव येथे पाहणी केली.

बदनापूर (जि.जालना) : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी (ता.२१) सकाळी केंद्रीय पथकातील त्रिसदस्यीय समिती बदनापूर तालुक्यातील वाकुळणी, बाजार वाहेगाव आणि रोषणगाव येथे पाहणी केली. सध्या रब्बी पिके उभी असताना तब्बल तीन महिने उशिराने खरीपातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक धडकल्याने 'जरा देर हो गयी मेहरबा आते - आते' अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. अर्थात राज्य शासनाकडून मिळालेली मदत तुटपुंजी असल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी केंद्राने तरी अतिवृष्टीग्रस्त पिकांसह खरवडलेल्या जमिनी आणि ढासळलेल्या विहिरींच्या नुकसानीची भरीव मदत द्यावी, अशी अपेक्षा पथकाकडे व्यक्त केली आहे.

 

 

यावेळी पथकासह जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निमा आरोरा, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी श्री. शिंदे, तहसिलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती. या पथकाचा वाकुळणी येथे सकाळी ८ वाजता नियोजित दौरा होता. त्यामुळे साधारण साडेसात वाजेपासून जिल्हाधिकारी श्री. बिनवडेंसह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा महामार्गावरील वाकुळणी फाट्यावर सज्ज होती.

 

 

केंद्रीय पथक तब्बल अडीच तास उशिराने वाकुळणी येथे पोचले. तिथे त्यांनी बाळासाहेब वाकुळणीकर यांच्या शेतात अतिवृष्टीने बाधित झालेल्या कपाशीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी पथकाने लागवड किती केली? एकूण खर्च किती आला? उत्पन्न किती मिळाले? असे प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांना विचारले. यानंतर पथकाने बाजार वाहेगाव शिवारातील संकेत नारायण काळे या शेतकऱ्याच्या अतिवृष्टीत ढासळलेल्या विहिरीची पाहणी केली. शेवटी पथकाने रोषणगाव शिवारातील निवृत्ती आसाराम खरात यांच्या जमीन खरवडलेल्या क्षेत्राची पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी आम्ही आपली मदत करण्यासाठी आलो आहोत, त्यामुळे वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. आम्ही नुकसानीचा आढावा केंद्र सरकारकडे सादर करणार आहोत, असे स्पष्ट केले.

 

माझ्या शेतातील खरीप पिकांचे वारंवार होणाऱ्या अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले. आमच्या एकत्रित कुटुंबाची २४ एकर जमीन असून त्यात १० ते १५ क्विंटल कापूस झाले. त्यामुळे आम्ही पीककर्ज कसे फेडावे? आमचा प्रपंच कसा चालवावा? असा प्रश्न पडला आहे. मदतीच्या नावाखाली आम्हाला केवळ सात हजार रुपये मिळाले आहेत. पिकांवर केलेल्या खर्चाच्या तुलनेत मदत नगण्य आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने याचा सारासार विचार करून मदत द्यावी.
 निवृत्ती खरात, शेतकरी, रोषणगाव

 

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Team Visits Heavy Rain Hit Jalna District