सभापती निवडीत बहुतेक पक्षांचा लागणार कस

दत्ता देशमुख
बुधवार, 7 डिसेंबर 2016

बीड - जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुकांचे निकाल आठ दिवसांपूर्वी लागले; मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्षांना खुर्चीवर बसण्यासाठी 24 किंवा 26 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. याच दिवशी उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक आणि सभापतींची निवड होणार आहे. पण, हे गणित किचकट असल्याने बहुतेकांचे कस आणि कसब पणाला लागणार आहे.

बीड - जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुकांचे निकाल आठ दिवसांपूर्वी लागले; मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्षांना खुर्चीवर बसण्यासाठी 24 किंवा 26 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. याच दिवशी उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक आणि सभापतींची निवड होणार आहे. पण, हे गणित किचकट असल्याने बहुतेकांचे कस आणि कसब पणाला लागणार आहे.

बीडसह परळी, माजलगाव, गेवराई, अंबाजोगाई आणि धारूर पालिकांच्या निवडणुकांचे निकाल 28 नोव्हेंबरला लागले. परळी, गेवराई आणि धारूरमध्ये ज्या पक्षाचा नगराध्यक्ष झाला त्या पक्षाचे बहुमतही आले. पण, अंबाजोगाई, बीडमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा तर बहुमत दुसऱ्या पक्षाकडे आहे. माजलगावमध्येही भाजप-अपक्ष असे बहुमत आहे. दरम्यान, 25 डिसेंबरला सहाही नगरपालिकांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपत आहे. मात्र, या दिवशी नाताळची सुटी असल्याने आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होणार आहे. या दिवशी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार घेऊन उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी होणार आहेत.

असे होतील स्वीकृत सदस्य
स्वीकृत सदस्यांसाठी एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आणि जास्तीत जास्त पाच असा निकष असल्याने बीडमध्ये पाच, परळी, अंबाजोगाईत प्रत्येक तीन तर माजलगाव, गेवराई व धारूरमध्ये प्रत्येकी दोन सदस्य स्वीकृत म्हणून घेता येतील. प्रत्येक पालिकेतील राजकीय पक्ष अथवा नोंदणीकृत आघाड्यांच्या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांच्या निवडी गटनेत्यांच्या शिफारशीनुसार केल्या जातील. मात्र, यासाठी मतदान होणार नाही. गटनेत्यांनी त्यांच्या वाट्याला येणाऱ्या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यपदासाठी शिफारसी करावयाच्या आहेत.

किचकट सूत्रामुळे अनेकांच्या अपेक्षांवर पाणी
बीड पालिकेतील त्रिशंकू परिस्थितीवरील सूत्रानुसार आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला दोन आणि एमआयएमच्या वाट्याला एक सदस्य येईल. शिवसेना आणि भाजपला संधी नसेल. तर अंबाजोगाईत राष्ट्रवादीकडे 29 पैकी 16 जागा असल्या तरी या ठिकाणी राष्ट्रवादीसह भाजप आणि कॉंग्रेसचा एक - एकच स्वीकृत नगरसेवक निवडता येईल. माजलगावात राष्ट्रवादी व भाजपच्या वाट्याला प्रत्येकी एक व परळीत मात्र तीनही सदस्य राष्ट्रवादीकडे तर गेवराईत दोनही सदस्य भाजपचे असतील. धारूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला एकेक नगरसेवक येईल.

सभापती निवडीत कस आणि कसब
सभापती निवडीमध्ये पक्षांचा आणि आघाड्यांचा खरा कस लागणार आहे. तर राजकीय कसब असणारेही बाजी मारण्याची शक्‍यता आहे.

सभापतींच्या निवडी त्या-त्या समित्यांचे सदस्य करणार असून, कोणत्या समितीवर कोणाचे किती सदस्य द्यायचे, हे त्या पक्षाच्या तौलानिक संख्याबळावर अवलंबून असेल. समितीची किमान सदस्य संख्या बारा तर कमाल संख्या 17 असणार आहे. सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला असेल. त्यामुळे पहिल्या बैठकीत तौलाणिक संख्या बळाचा विचार करून समितीची सदस्य संख्या किती राहते यावरही सभापती पदाची गणिते अवलंबून राहतील. बीड पालिकेतील तौलानिक संख्याबळाचा विचार करता आघाडीच्या वाट्याला सर्वाधिक सभापतीपदे येऊ शकतात. मात्र, एमआयएमच्या भूमिकेवर सारी परिस्थिती अवलंबून असेल.

अंबाजोगाईतही भाजप नेमकी काय भूमिका घेईल, यावर समित्यांचे चित्र अवलंबून राहणार आहे. परळीत राष्ट्रवादीला तर गेवराईत भाजपाला सर्व सभापतीपदांवर दावा सांगता येईल. धारूरमधील लढतही लक्षणीत असेल. समिती सभापतीपदासाठी हात उंचावून मतदान असल्याने पक्षांतर बंदीचा विचार करूनच सदस्यांना मतदान करावे लागणार आहे.

अपक्षांना नोंदवावे लागणार गट
ज्या ठिकाणी राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत अथवा अनोंदणीकृत स्थानिक आघाडी करून जे उमेदवार निवडून आले आहेत त्यांना निवडणूक निकालाच्या एक महिन्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष उपस्थित राहून गटाची नोंदणी करावी लागेल. अशी नोंदणी झाल्याशिवाय समित्यांमधील प्रतिनिधित्व देताना तौलानिक संख्याबळात त्यांचा विचार केला जाणार नाही.

Web Title: chairman election in beed